गुजरातमधल्या अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळ्याची घटना समोर आली आहे. या विमानात २४२ प्रवासी बसले होते. हे विमान अहमदाबाद येथून लंडनला चाललं होतं. विमान नागरी वस्तीत कोसळलं त्यामुळे परिसरात धुराचे लोट आणि आगीचे लोळ पाहण्यास मिळाले. या अपघातानंतर गुजरातमधली विमान सेवा विस्कळीत झाली आहे.
टेक ऑफ करताच विमानाचा अपघात
एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान – सीरियल नंबर ३६२७९) या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे. २४२ प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं. तसेच यात दोन पायलटसह १२ क्रू सदस्य होते. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळच ही दुर्घटना घडली आहे. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांत (७ किमी दूर) ते कोसळलं. आता या अपघातामुळे विमान सेवेवर कसा परिणाम झाला आहे हे आपण जाणून घेऊ.
कुठल्या विमानांची उड्डाणं उशिराने?
रायपूरला जाणारं इंडिगो 6E6194 विमान उशिराने या विमानाची वेळ दुपारी ३.२५ ची होती ती आता संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सुटेल.
स्पाईसजेट SG616 या विमानाची वेळही बदलण्यात आली आहे. हे विमान देहरादूनला जाणार होतं. हे विमान ३ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार होतं. हे विमान आता संध्याकाळी ५ वाजता सुटेल.
इंडिगो 6E7581 हे भोपाळला ३ वाजून ५० मिनिटांनी जाणारं विमान आता ४ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण घेईल.
इंडिगोचं 6E347 हे अमृतसरला जाणारं विमानही आता ३ वाजून ५० मिनिटांनी सुटण्याऐवजी ५ वाजून ४० मिनिटांनी सुटेल.
6E5201 हे इंडिगोचं विमान मुंबईला ४ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार होतं ते आता संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटेल.
6E381 हे इंडिगोचं गोव्याला जाणारं विमान संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांऐवजी संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी गोव्यासाठी सुटेल.
6E6553 हे इंडिगोचं पुण्याला जाणारं विमान पाच वाजून १० मिनिटांऐवजी आता संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल.
इंडिगोचं 6E6713 हे विमान ५ वाजून ५० मिनिटांनी सुटण्याऐवजी आता रात्री ९ वाजून १० मिनिटांनी देहरादूनला जाईल.
6E6654 हे रांचीला जाणारं इंडिगोचं विमानही आता संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांच्या ऐवजी रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. skyscanner.co.in ही माहिती दिली आहे. पुढील माहिती मिळेपर्यंत अहमदाबादचा विमानतळ बंद ठेवण्यात आला आहे.
विमान दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांना फोन करून केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे.