पीटीआय, अहमदाबाद

एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाला गुरुवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल विमानतळानजीक झालेला भीषण अपघात हळहळ व्यक्त करण्याबरोबरच अनेक प्रश्न उपस्थित करणाराही ठरला. रात्री उशिरापर्यंत २६५ मृतदेह बाहेर काढण्यात आले असताना हे बळी घेणारा अपघात नेमका घडला कसा, याविषयी संदिग्धता रात्री उशिरापर्यंत कायम होती.

बोइंग कंपनीच्या दृष्टीने, भारतासारख्या जगातील चौथ्या सर्वांत मोठ्या प्रवासी हवाई बाजारपेठेच्या दृष्टीने, एअर इंडिया कंपनीचे परिचालन करणाऱ्या टाटा उद्याोगसमूहाच्या दृष्टीने, सक्षम अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असलेल्या भारताच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने आणि अर्थातच अकाली जीवनरेषा भंगलेल्या मृतांच्या नातेवाईकांसाठी या अपघाताच्या रूपाने जणू आकाशच कोसळले.

उड्डाण केल्यानंतर अवघ्या ३०-४० सेकंदांमध्ये हे विमान नजीकच्या बी. जे. वैद्याकीय महाविद्यालयाच्या परिसरात कोसळले. यात विमानातील २४२पैकी २४१ प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांच मृत्यू झाला असून महाविद्यालयाच्या ज्या इमारतीवर हे विमान कोसळले, तेथील किमान पाच जणही मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येते.

एआय १७१ उड्डाण क्रमांकाचे हे विमान बोइंग – ७८७ ड्रीमलायनर प्रकारातील होते. या कंपनीच्या बोइंग – ७३७ प्रकारातील विमानांच्या अलीकडच्या काळातील तीन अपघातांची चर्चा आणि चौकशी सुरू असली, तरी ड्रीमलायनर या प्रतिष्ठित विमानाला झालेला हा पहिलाच भीषण अपघात ठरला. या विमानाला उड्डाण करताना पक्ष्याची धडक बसली का, दोन्ही इंजिनांमध्ये एकाच वेळी अचानक बिघाड झाला का, विमानाने अचानक ऊर्जा गमावली का, वैमानिकाने आणीबाणीमध्ये पुरेशी खबरदारी घेतली का आदि प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत किंवा महिन्यांत मिळण्याची शक्यता आहे.

बोइंग ही अमेरिकेतील प्रतिष्ठित कंपनी आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये या कंपनीच्या विमानांतील सुरक्षा दक्षतेबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. बोइंग-७३७ प्रकारातील या कंपनीच्या गेल्या सात वर्षांत झालेल्या तीन मोठ्या अपघातांची चौकशी सुरू आहे. तरीदेखील या अपघातांपेक्षाही भारतातील अपघाताची तीव्रता आणि संभाव्य परिणाम कितीतरी अधिक आणि दीर्घकालीन संभवतात.

मृत्यूला चकवा

आतापर्यंत केवळ एक प्रवासी अपघातातून बचावल्याचे सोमार आले आहे. विश्वासकुमार रमेश हे ‘११ए’ आसनावर होते. अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी याला दुजोरा दिला. आतापर्यंत घटनास्थळावरून २०४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आणखी काही जण बचावल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मलिक म्हणाले. रमेश यांच्यावर अहमदाबाद सार्वजनिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. समाजमाध्यमांवर प्रसृत झालेल्या दृष्यांमध्ये सदर प्रवासी अपघातस्थळावरून धावत जाताना दिसत आहे. त्यानंतर या प्रवाशाला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेल्याची माहिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहमदाबाद दुर्घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आणि दु:ख झाले आहे. ते शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.नरेंद्र मोदीपंतप्रधान