Air India Express: गुजरातमधील अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाचं एक विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल २७५ जणांचा बळी गेला. या घटनेत विमानातील पायलट आणि क्रू सदस्यांचा देखील मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याचा दावा आता केला जात आहे. ही घटना ताजी असतानाच आता एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान धावपट्टीवरच एका तासांपेक्षा जास्त काळ थांबवण्याची वेळ आल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील हिंडन विमानतळावरून कोलकाताकडे एअर इंडिया एक्सप्रेसचं IX१५११ हे विमान निघालं होतं. मात्र, विमानाच्या उड्डाणापूर्वी काही तांत्रिक बिघाड आढळून आल्यामुळे या विमानाच्या उड्डाणाला उशीर झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असल्याचं वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे. वृत्तानुसार, हिंडन विमानतळावरून नियोजित वेळेत हे विमान निघालं होतं. पण विमान उड्डाण घेणार तितक्यात विमानातील कर्मचाऱ्यांना शेवटच्या क्षणी तांत्रिक बिघाड आढळला.
आतापर्यंत समोर आलेल्या वृत्तानुसार, या विमानातील बिघाडाचं नेमकं स्वरूप अद्याप उघड झालेलं नाही. पण या तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीसाठी अभियंत्यांना पाचारण करण्यात आलं होतं. त्यामुळे या विमानाच्या उड्डाणाला विलंब झाल्याचं सांगितलं जात आहे. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसने एका संक्षिप्त निवेदनात विलंबाची पुष्टी केली आणि या व्यत्ययाबद्दल माफी मागितली आहे.
याबाबत एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितलं की, “आमच्या हिंडन-कोलकाता विमानाला मूळ विमानात काही बिघाड झाल्यामुळे विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांना मोफत वेळापत्रक बदलण्याची किंवा तिकीट रद्द करण्याची ऑफर देण्यात आली होती. तसेच संपूर्ण रक्कम परत करण्याची ऑफर देण्यात आली होती. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. मात्र, आता अभियंत्यांनी विमान सुरक्षितपणे चालवण्यासाठी परवानगी दिल्यानंतर अखेर हे विमान रवाना झाले आहे”, असं एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.