Air India Plane Crash Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत तब्बल २६५ जणांचा मृत्यू झाला. हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं. मात्र, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ही दुर्घटना घडली. या दुर्घेटनेत विमानातील सर्व क्रू मेंबर्ससह २६५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या विमान दुर्घटनेत १२ क्रू मेंबर्स होते. या क्रू मेंबर्समध्ये मणिपूरच्या थौबलमधील एअर होस्टेस नगांथोई शर्मा कोंगब्रैलाटपम (वय २१) यांचाही मृत्यू झाला आहे.
गुरुवारी सकाळी ११:३० च्या सुमारास एअर होस्टेस नगांथोई शर्मा कोंगब्रैलाटपम यांनी त्यांच्या मोठ्या बहिणीला फोन करून सांगितलं होतं की त्या लंडनला निघाल्या आहेत. मात्र, त्यानंतर काही वेळातच या अपघाताची घटना घडल्याची बातमी त्यांच्या समोर आल्याने त्यांच्या कुटुंबाना धक्का बसला. या घटनेनंतर एअर होस्टेस नगांथोई शर्मा कोंगब्रैलाटपम यांच्याबाबत त्यांच्या वडिलांनी सांगितलं की, “नगांथोई म्हणाली होती की ती पुढील काही दिवस फोन करू शकणार नाही आणि १५ जून रोजी लंडनवरून आल्यानंतर फोन करेन. पण हाच कॉल आमच्यासाठी शेवटचा फोन ठरला”, असं वडील नंदेश कुमार शर्मा सांगितलं. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
नंदेश कुमार शर्मा यांनी पुढे म्हटलं की, “आम्हाला आमच्या मोठ्या मुलीने विमान क्रॅश झाल्याचं वृत्त पाहून घाबरून फोन केला. आम्हाला वाटलं की ती देखील त्या विमानात अशू शकते. मात्र, आम्हाला एअर इंडिया किंवा कोणत्याही प्रतिनिधीकडून कोणतीही माहिती सांगण्यात आली नाही. आम्हाला फक्त बातम्यावरून माहिती मिळाली. तीन मुलींपैकी ती आमची मधली मुलगी होती आणि नगांथोईचा हा पहिलाच जॉब होता. २०२३ मध्ये एअर इंडियामध्ये ती रुजू झाली होती”, असं त्यांनी म्हटलं.
“नगांथोईने नुकतीच इंफाळमधील डीएम कॉलेजमध्ये पहिल्या सत्राची परीक्षा दिली होती. तिच्या काही मैत्रिणी एअर होस्टेस बनण्यासाठी प्रशिक्षण घेत होत्या. जेव्हा ती मुलाखतीसाठी गेली होती तेव्हा तिची सर्वात शेवटी निवड झाली होती. त्यामुळे अगदी खूप लहान वयात ती जॉबला लागल्यामुळे आम्हाला आनंद वाटला होता. कारण तिला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली होती. तिच्या नोकरीमुळे ती सतत फिरत राहायची”, असंही नंदेश कुमार शर्मा म्हटलं.
एअर होस्टेस नगांथोई शर्मा कोंगब्रैलाटपमच्या वडिलांनी सांगितलं की, “ती या वर्षी मार्चमध्ये शेवटची घरी आली होती. ती फक्त काही दिवस राहिली. काही दिवस कामावरून सुट्टी मिळाल्यावर ती तिच्या मोठ्या बहिणीबरोबर आम्हच्या भेटीसाठी येत असे. तसेच ती आमच्या सर्वांची खूप चांगली काळजी घेत असायची”, असंही वडील नंदेश कुमार शर्मा यांनी म्हटलं आहे.