Supriya Sule On Air India Flight : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर एअर इंडिया सावध पावलं टाकताना दिसत आहे. कारण आज (१७ जून) दिवसभरात विविध शहरांमधून आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आले. यामध्ये अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान रद्द करण्यात आलं, तसेच अमृतसरहून लंडनला जाणारं विमानही रद्द करण्यात आलं. तसेच दिल्लीहून पॅरिसला जाणारं एअर इंडियाचं विमान रद्द करण्यात आलं.

समोर आलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात एअर इंडियाने ७ उड्डाणे रद्द केले. एअर इंडियाच्या विमानाला सातत्याने अशा प्रकारे विलंब होत असल्यामुळे अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील एअर इंडियाच्या विमानाच्या विलंबावरून नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित ‘खूपच वाईट सेवा’ असल्याचं म्हणत एअर इंडियाच्या विमानाच्या विलंबावरून संताप व्यक्त केला आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

एअर इंडियाच्या एआय २९७१ या क्रमांकाच्या विमानाने सुप्रिया सुळे या दिल्लीहून पुण्याला प्रवास करत होत्या. पण विमानाला तीन तास उशिर झाल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, “दिल्ली ते पुणे असा प्रवास एअर इंडियाच्या एआय २९७१ या विमानाने करत आहे. विमानाला ३ तासांपेक्षा जास्त उशीर झाला आहे. पण तरीही त्याबाबत प्रवाशांना कोणताही संपर्क करण्यात आला नाही, किंवा कोणतीही अपडेट नाही, मदत नाही, खूप वाईट सेवा आहे. एअर इंडियामध्ये असा विलंब आणि गैरव्यवस्थापन हे नेहमीचंच झालं आहे. प्रवासी अडकले असून असहाय्य आहेत. ही उदासीनता अस्वीकार्य आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला टॅग करत याबाबत हस्तक्षेप करून विमान कंपनीची जबाबदारी निश्चित करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळायला हव्यात अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एअर इंडियाची दिवसभरात ७ उड्डाणे रद्द

– एआय९१५ – दिल्ली ते दुबाई (बी७८८ ड्रीमलायनर)
– एआय१५३ – दिल्ली ते व्हिएन्ना (बी७८८ ड्रीमलायनर)
– एआय१४३ – दिल्ली ते पॅरिस (बी७८८ ड्रीमलायनर)
– एआय१५९ – अहमदाबाद ते लंडन (बी७८८ ड्रीमलायनर)
– एआय१७० – लंडन ते अमृतसर (बी७८८ ड्रीमलायनर)
– एआय१३३ – बंगळुरू ते लंडन (बी७८८ ड्रीमलायनर)
– एआय१७९ – मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को (बी७७७ ड्रीमलायनर)