एपी, जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गच्या सोवेटो परिसरात एका मद्यालयात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात १५ जण मृत्युमुखी पडले. काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्याचे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. शनिवारी रात्री उशिरा अनोळखी पुरुषांचा एक गट मिनीबसमधून आला आणि त्यांनी मद्यालयाच्या सुरक्षारक्षकासह मद्यालयातील ग्राहकांनाही लक्ष्य केले. पोलिसांनी रविवारी पहाटे मृतदेह येथून हलवले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.

गौतेंग प्रांताचे पोलीस आयुक्त, लेफ्टनंट जनरल इलियास मावेला यांनी सांगितले की, घटनास्थळी सापडलेल्या काडतुसांच्या संख्येवरून असे दिसते की ही हल्लेखोरांनी ठरवून केलेल्या गोळीबाराची घटना आहे. तेथे उपस्थित असलेले लोक परवाना असलेल्या या मद्यालयात आनंदोत्सव साजरा करत होते. अचानक त्यांना गोळीबाराचा आवाज आला आणि त्यांनी मद्यालयातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमागचा हेतू काय आहे आणि या लोकांना का लक्ष्य करण्यात आले, याची अद्याप आमच्याकडे संपूर्ण माहिती नाही. या दुर्घटनेत अद्ययावत ( हाय कॅलिबर) बंदुकींचा वापर झाला आहे. रायफल आणि ९ मिलिमीटर पिस्तुलाच्या साह्याने हल्लेखोर अंदाधुंद गोळीबार करत होते. हल्ला जेथे झाला त्या स्थळी अंधार असल्याने हल्लेखोरांची ओळख पटू शकली नाही.

दुसऱ्या घटनेत शनिवारी रात्री पीटरमारित्झबर्ग या किनारपट्टीच्या शहरातील स्वीटवॉटर उपनगरात अज्ञात बंदूकधाऱ्यांच्या हल्ल्यात चार जण मृत्युमुखी पडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जण येथील मद्यालयात आले व त्यांनी बेछुट गोळीबार सुरू केला. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला व अन्य दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आठ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जण ३० ते ४५ वर्षे वयोगटातील आहेत.

ईस्ट लंडनमधील मृत्यू्ंचे गूढ अद्याप कायम

ईस्ट लंडन शहरातील एका मद्यालयात २१ किशोरवयीन मुले संशयास्पदरीत्या मृत्युमुखी झाल्याच्या घटनेनंतर गोळीबाराच्या या घटना घडल्या आहेत. त्या २१ मुलांचा मृत्यू गोळीबारात झाला नव्हता. चेंगराचेंगरीनेही त्यांचा मृत्यू झाला नव्हता. या घटनेमागचेही कारणही अद्याप समजू शकलेले नाही.