Pakistan-Afghanistan Tension: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष पेटला आहे. पाकिस्तानी सैन्याने नुकताच पक्तिता प्रांतात केलेल्या हल्ल्यात अफगाणिस्तानमधील सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात तीन स्थानिक क्रिकेटपटूंचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी शुक्रवारी अफगाणिस्तानवर जोरदार टीका केली होती. पाकिस्तानात राहत असलेल्या सर्व अफगाण नागरिकांनी त्यांच्या मायदेशी परतावे आणि अफगाणिस्तानशी असलेले जुन्या संबंधाचा काळ संपला असल्याचे ते म्हणाले.

अफगाणिस्तानवर टीका करताना ख्वाजा आसिफ यांनी यात भारतालाही ओढले. ते म्हणाले, पाकिस्तानी भूमीवर राहणाऱ्या सर्व अफगाण नागरिकांनी आता त्यांच्या देशात परतले पाहिजे. त्यांचे स्वतःचे सरकार आता आहे. आमच्या जमिनीवरील संसाधने ही केवळ पाकिस्तानमधील २५ कोटी नागरिकांसाठी आहेत.

ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अफगाणिस्तानला फटकारले. शुक्रवारी सायंकाळी दोन दिवसांचा शस्त्रविराम संपत असताना ख्वाजा आसिफ यांनी ही टीका केली. तथापि, शस्त्रविराम वाढण्याची शक्यता काल वर्तविण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी तोडगा काढण्यासाठी दोहा येथे द्वीपक्षीय चर्चा होण्याची अपेक्षा होती.

तालिबानने म्हटले की, पाकिस्तानने डुरंड रेषेवरील पक्तिता प्रांतातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर एका वरिष्ठ तालिबान अधिकाऱ्याने सांगितले की, युद्धविरामाचा हा भंग आहे.

अफगाणिस्तानला किंमत मोजावी लागेल

ख्वाजा आसिफ यांनी पुढे लिहिले की, पाकिस्तान आता अफगाणिस्तानशी पूर्वीसारखे संबंध राखू शकत नाही. पाकिस्तानने अनेक वर्ष संयम दाखवला होता. परंतु अफगाणिस्तानकडून त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अफगाण सीमेमधून होणाऱ्या हल्ल्याचा विरोध म्हणून पाकिस्तानने ८३६ निषेध पत्रे आणि १३ निवेदने पाठवली असल्याचेही आसिफ यांनी उघड केले. यापुढे आम्ही निवेदन पाठवणार नाही तर दहशतवादाला तोडीस तोड उत्तर देऊ. त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल.

भारतावर कोणते आरोप केले?

तालिबान सराकर भारताच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा आरोप ख्वाजा आसिफ यांनी केला. भारत आणि बंदी असलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यांचे संगनमत असून ते पाकिस्तानविरोधात कट रचत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

काबूलचे राज्यकर्ते आता भारताच्या मांडीवर बसून पाकिस्तानविरोधात कट रचत आहेत. एकेकाळी ते (अफगाणिस्तान) आमच्या पंखाखाली होते. आमच्या भूमीवर ते लपून बसले होते, अशीटी टीका आसिफ यांनी केली.

ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांचीही आकडेवारी दिली. २०२१ साली तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यापासून पाकिस्तानवर १०,३४७ अतिरेकी हल्ले झाले असून त्यात ३,८४४ सामान्य लोक आणि सुरक्षा दलाचे कर्मचारी मरण पावले असल्याचे ते म्हणाले.