कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली. केजरीवाल यांच्यावरील कारवाईनंतर जर्मनीने टिप्पणी करत केजरीवाल यांना निष्पक्ष खटला चालवण्याची संधी मिळेल, अशी आशा असल्याचे म्हटले होते. यावर भारताने जर्मनीला खडेबोल सुनावले होते. यानंतर अमेरिकेनेही अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईबाबत टिप्पणी केली होती. अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताने बुधवारी (२७ मार्च) अमेरिकेच्या उपराजदूत ग्‍लोरिया बेरबेना यांना बोलावून घेत यासंदर्भात तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

भारताने काय म्हटले?

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, “भारतातील काही कायदेशीर कार्यवाहीबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या टिप्पण्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. इतरांच्या सार्वभौमत्वाचा आणि अंतर्गत बाबींचा आदर करणे अपेक्षित आहे. भारताच्या कायदेशीर प्रक्रियांवर आणि एक स्वतंत्र न्यायव्यवस्था जी वस्तुनिष्ठ आणि वेळेवर निकालासाठी वचनबद्ध आहे. त्यावर आक्षेप घेणे अयोग्य आहे”, अशा शब्दात भारताने आक्षेप नोंदवला.

Riot manipur
अमेरिकेचा भारताबाबतचा अहवाल अत्यंत पक्षपाती; परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून खंडन 
stop manipur violence
‘मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन’, अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताची रोखठोक प्रतिक्रिया
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
china vs us
अरुणाचलबाबत अमेरिका भारताच्या बाजूने, चीनचा जळफळाट; म्हणे, “अमेरिका आमच्यात भांडणं लावतेय!”

अमेरिकेने काय टिप्पणी केली होती?

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले होते, “मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईवर आम्हीदेखील बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. निष्पक्षपणे कायद्याच्या प्रक्रियेचे पालन होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे”, अशी टिप्पणी अमेरिकेने केली होती.

हेही वाचा : ‘आप’ विरुद्ध भाजप; केजरीवाल यांच्या समर्थनार्थ ‘आप’ची निदर्शने, भाजपकडून राजीनाम्याची मागणी

जर्मनीने काय टिप्पणी केली होती?

अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या कारवाईसंदर्भात जर्मनीने म्हटले होते, “अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईची दखल घेण्यात आली आहे. भारत लोकशाही असणारा देश आहे. केजरीवाल यांना निष्पक्ष खटला चालवण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे”, असे जर्मनीने म्हटले होते.

भारताने जर्मनीला काय प्रत्युत्तर दिले होते?

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीने टिप्पणी केल्यानंतर भारताने जर्मन राजदूताकडे नाराजी व्यक्त केली होती. तसेच अशा प्रकारच्या टिप्पण्यांना आम्ही देशाच्या न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करणे किंवा आमच्या न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर हल्ला करण्याच्या दृष्टीने पाहतो. भारत हा लोकशाही असणारा देश असून जर्मनीने केलेले वक्तव्य अयोग्य आहे, असे भारताने म्हटले होते.

अरविंद केजरीवाल यांना अटक का झाली?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने २१ मार्चला अटक केली. यानंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी दिली आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी अरविंद केजरीवाल यांना ईडीने ९ वेळा समन्स बजावले होते. पण तरीही अरविंद केजरीवाल चौकशीला हजर झाले नाही. यानंतर ईडीकडून केजरीवाल यांना अटक करण्यात आली.