Pakistani Army Chief Asim Munir on Nuclear Rhetoric: पाकिस्तानचे लष्करप्रमुख, फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तान स्वतः अफगाणिस्तानच्या निष्पाप सामान्य नागरिकांवर बॉम्बवर्षाव करत असताना असीम मुनीर यांनी अण्वस्त्रांचा उल्लेख करत भारताविरोधात विधान केले आहे. पाकिस्तानची लष्करी ताकद वाढत असून आम्ही भारताच्या युद्धक्षेत्राचा भूगोल बदलून टाकू, अशी पोकळ डरकाळी मुनीर यांनी फोडली आहे.

पाकिस्तानच्या काकुल येथील पाकिस्तानी मिलिटरी अकादमी येथे भाषण करत असताना असीम मुनीर यांनी भारताविरोधात चिथावणीची भाषा वापरली. पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, मुनीर यांच्या आतापर्यंतच्या सर्वात प्रक्षोभक भाषणांपैकी हे एक भाषण होते.

मे महिन्यात भारताविरोधात उडालेल्या संघर्षात पाकिस्तानने स्पष्ट विजय मिळविला आहे आणि यापुढे भारताकडून कोणत्याही चिथावणीला पाकिस्तानी लष्कर निर्णायक प्रतिसाद देईल, असे विधान असीम मुनीर यांनी यावेळी केले.

असीम मुनीर म्हणाले, “मी भारताच्या लष्करी नेतृत्वाला सल्ला आणि इशारा देतो की, दोन अण्वस्त्रधारी देशांनी युद्धाला अजिबात थारा देऊ नये. जर शत्रुत्वाची नवी लाट सुरू झाली तर पाकिस्तान समोरच्या देशापेक्षा खूप जास्त प्रतिकार करेल. लढाई आणि दळणवळण क्षेत्रातील फरक कमी होत असल्यामुळे आमच्या शस्त्रांची पोहोच आणि प्राणघातकता भारताच्या भुगोलाच्या कल्पित प्रतिकारशक्तीला धक्का देऊ शकते.”

.. म्हणे पाकिस्तानने प्रादेशिक स्थिरता दिली

चिथावणीखोर विधान केल्यानंतर असीम मुनीर यांनी आपल्या भाषणाचा सूर मध्येच बदलला. ते पुढे म्हणाले, जगात अशांतता असताना पाकिस्तानने प्रादेशिक स्थिरता प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी पाकिस्तानचे चीन, अमेरिका, सौदी अरेबिया आणि इराणशी जवळचे संबंध असल्याचे नमूद केले. चीनशी त्यांची ऐतिहासिक अशी अभूतपूर्व भागीदारी निर्माण झाली आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करताना त्यांनी ट्रम्प यांना शांतता प्रस्थापित करणारे धोरणात्मक नेते म्हटले.

हास्यास्पद बाब म्हणजे, असीम मुनीर पाकिस्तानला प्रादेशिक स्थिरता आणणारा देश म्हणत आहेत. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडून अफगाणिस्तानवर बॉम्बवर्षाव सुरू आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात शनिवारी अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला.