Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी तणाव चांगलाच वाढला आहे. यादरम्यान ऑगस्ट महिन्यात भारतीय रिफायनर्सनी अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे. स्पर्धात्मक किंमतीत हे कच्चे तेल मिळत असल्याने ही खरेदी वाढवण्यात आली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमधील राजकीय तणावाच्या काळात अमेरिकेकडून कच्च्या तेलाची जास्त खरेदी केल्याने भारताचा अमेरिकेबरोबरील व्यापार असमतोल कमी होण्याची शक्यता आहे.
भारतातील आघाडीची रिफायनरी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांमध्ये डिलिव्हरीसाठी टेंडर प्रक्रियेद्वारे अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडियट (WTI) क्रूड ऑइल विकत घेतले आहे, असे वृत्त रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने एप्रिल ते मे दरम्यान डिलिव्हरीसाठी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांकडून सत्तर लाख बॅरल वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्चे तेल खरेदी केले होते.
यापूर्वी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने (BPCL) वीस लाख बॅरल अमेरिकन WTI कच्चे तेल विकत घेतले, तर रिलायन्स इंडस्ट्रीजने (RIL) विटोल (Vitol) या कंपनीकडून वीस लाख बॅरल WTI कच्च्या तेलाची खरेदी केली.
आशीयाच्या बाजारपेठेसाठी अमेरिकन कच्चे तेल आर्थिकदृष्ट्या अधिक परवडणारे झाल्यानंतर भारतीय रिफायनरी तसेच आशियामधील इतर कंपन्यांनी त्यांची या कच्च्या तेलाची मागणी वाढवली. याबरोबरच रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचे कारण देत भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारतावर अमेरिकन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी प्रचंड दबाव वाढला आहे.
सूत्रांनी असेही सुचवले की, युरोपियन व्यापारी Gunvor and Equinor यांनी प्रत्येकी दोन मिलियन बॅरल्स, तर Mercuria ने एक मिलियन बॅरल्स तेल इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला पुरवले. तसेच त्यांनी असेही सांगितले की, बीपीसीएलने पहिल्यांदाट Nigerian Utapate तेलाच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे .
रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबणार का?
भारताने अमेरिकेकडून तेल खरेदी वाढवली जरी असली तरी भारताचा रशियाकडून तेल खरेदी करण्याची भूमिका मात्र ठाम आहे. गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या आरोपांना उत्तर देताना, “भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल ज्यांना समस्या आहे, त्यांनी आमच्याकडून तेल खरेदी करणे बंद करावे,” अशा शब्दांमध्येअमेरिकेला फटकारले. जयशंकर म्हणाले की, व्यवसायाभिमुख अमेरिकी प्रशासनासाठी काम करणारे लोक इतरांवर व्यवसाय करत असल्याचा आरोप करणे गमतीदार आहे. त्याचवेळी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू असून काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि लघु उत्पादकांच्या हितसंबंधांवर सरकार तडजोड करणार नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. यावर आम्ही ठाम आहोत, असे ते म्हणाले.
भारतावरील आयातशुल्कचा मुद्दा रशियाकडून तेल खरेदीशी जोडण्यास जयशंकर यांनी विरोध केला. या दोन्ही बाबींचा परस्परांशी काही संबंध आहे असे दाखवणे चूक आहे असे ते म्हणाले. रशियाकडून जास्त तेल घेणारे इतर देशही आहेत, रशिया-युरोप व्यापार हा भारत-रशिया व्यापारापेक्षा अधिक आहे असे त्यांनी लक्षात आणून दिले.