“भारतातील बहुतेक इतिहासकारांनी इतिहास नोंदवताना केवळ मुघलांचीच चर्चा केली. त्यांनी पांड्या, चोला, मौर्या, गुप्ता आणि अहोम राज्यकर्त्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केलं,” असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (१० जून) केला. अमित शाह दिल्लीत ‘महाराणा : सहस्त्र वर्ष का धर्म योद्धा’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

अमित शाह म्हणाले, “मला इतिहास लिहिणाऱ्यांविषयी देखील काही बोलायचं आहे. आपल्याकडे अनेक राजवटी होऊन गेल्या. मात्र, इतिहास लिहिणाऱ्यांनी जेव्हा या राजवटींची इतिहासात नोंद करण्याची वेळ आली तेव्हा मुघल राजवटीचीच चर्चा केली. पांड्य राजवट ८०० वर्षे होती. आसाममध्ये अहोम राजवट ६५० वर्षे चालली. खिलजीपासून औरंगजेबपर्यंत अनेकांना त्यांनी पराभूत केलं. त्यांनी आसामला स्वतंत्र ठेवलं.”

“पल्लव साम्राज्य ६०० वर्षे, चालुक्य साम्राज्य ६०० वर्षे चाललं, मौर्यांनी ५५० वर्षे अफगाणिस्तानपासून श्रीलंकेपर्यंत राज्य केलं. सातवाहनने देखील ५०० वर्षे राज्य केलं. गुप्त राजवटीने ४०० वर्षे राज्य केलं. समुद्र गुप्तने पहिल्यांदा भारताच्या संकल्पनेला वास्तवात आणण्याचं धाडस केलं आणि यशही मिळवलं. मात्र, या सर्व गोष्टींवर संदर्भ ग्रंथ लिहिण्यात आले नाही,” असं अमित शाह यांनी सांगितलं.

हेही वाचा : “…तेव्हा मी रात्री १२ वाजता अमित शाह यांना फोन केला होता”, संजय राऊतांनी सांगितला ‘तो’ घटनाक्रम!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपण त्यावरील टीकेचा भाग सोडून आपला अभिमानास्पद इतिहास जनतेसमोर ठेवला पाहिजे. यावर संदर्भ ग्रंथांची निर्मिती व्हायला हवी. हळूहळू आपण जो इतिहास चुकीचा मानतो तो आपोआप मागे पडेल आणि सत्य समोर येईल. यासाठी खूप लोकांनी काम करण्याची गरज आहे,” असंही अमित शाह यांनी नमूद केलं.