Amit Shah On Manipur Violence: गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत मणिपूरच्या हिंसाचारावर चर्चेदरम्यान विरोधकांना प्रत्युत्तर देत मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत असं सांगितलं. मे महिन्याच्या सुरुवातीला हिंसाचार सुरू झाल्यापासून आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत असंही ते म्हणाले. मोदी सरकारच्या विरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वासाच्या ठरावाच्या वेळी राहुल गांधी यांनी जोरदार टीका करत, केंद्र सरकारने “भारत मातेचे नुकसान” केले आहे असं म्हटलं होतं. यावर उत्तर देताना अमित शहा यांनी मणिपूरच्या हिंसाचारानंतर मोदींच्या भूमिकेविषयी भाष्य केलं.
मणिपूर हिंसाचारानंतर मोदींनी काय केलं?
अमित शहा म्हणाले की, “मला देशाला सांगायचे आहे की, मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या बातम्या आल्या तेव्हा पंतप्रधानांनी मला पहाटे ४ वाजता फोन केला. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता फोन करून मला उठवलं. सलग तीन दिवस आम्ही शांतता सुनिश्चित करण्यासाठी कठोर परिश्रम करत होतो, आम्ही १६ व्हिडिओ कॉन्फरन्स घेतल्या, ३६,००० सीएपीएफ (केंद्रीय पोलिस) कर्मचारी तात्काळ पाठवले, हवाई दलाची विमाने वापरली, मुख्य सचिव आणि डीजीपी (पोलीस प्रमुख) बदलले, सूरतहून सल्लागार पाठवला. हे सगळं काही ४ मे या दिवशीच करण्यात आलं. इतकं करूनही “मोदींना काहीच फरक पडत नाही” असंच विरोधक म्हणत आहेत. “
मणिपूर हिंसाचारावरून अमित शहा यांचा विरोधकांना प्रश्न
तसेच, मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा प्रकार हा ४ मे ला घडूनही १९ जुलैलाच म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी नेमका तो व्हिडीओ लीक करण्याचा हेतू काय होता यावरही शहांनी प्रश्न केला. “मणिपूरमध्ये हिंसाचाराचे चक्र सुरू आहे याबाबत विरोधी पक्षाशी मी सहमत आहे. अशा घटनांचे कोणीच समर्थन करू शकत नाही. जे काही घडले ते लज्जास्पद आहे, परंतु फक्त त्या घटनांचं राजकारण करणं अधिक लज्जास्पद आहे,”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट रोजी चर्चेला उत्तर देणार आहेत ज्यानंतर मतदान केले जाईल. भाजप व संलग्न पक्षांचे केंद्रातील संख्याबळ पाहता अविश्वासाचा ठराव अमान्य होणार हे अपेक्षित आहे. दुसरीकडे अमित शहा यांनी संतप्त कुकी आणि मैतई समुदायांना हात जोडून मणिपूरमध्ये शांतता राखण्याचे आणि जातीय हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी केंद्राशी चर्चा करण्याचे आवाहन केले.