Amit Shah On Nitish Kumar In Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. अनेक दिग्गज नेते मंडळी बिहारमध्ये सभा आणि रॅली काढत मोठ्या घोषणा करत आहेत. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून धूसफूस सुरु असल्याची चर्चा आहे.
बिहारच्या जनतेनी जर पुन्हा एनडीएला कौल दिला तर एनडीएमध्ये मुख्यमंत्री पदाची संधी नेमकं कोणाला मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टीकरण देताना मोठं भाष्य केलं आहे. तसेच बिहार राज्यात एनडीएमध्ये धूसफूस सुरू असल्याच्या सर्व चर्चा अमित शाह यांनी फेटाळून लावल्या आहेत.
एनडीए मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कधी ठरवणार?
तसेच बिहार विधानसभेची निवडणूक एनडीए मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढवत असल्याचंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसेच बिहारच्या राजकारणाबाबत बोलताना अमित शाह यांनी म्हटलं की, “भाजपा आणि आमचे मित्रपक्ष निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवतील. १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाल्यावर एनडीए मागील सर्व विक्रम मोडेल”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
नितीश कुमार मुख्यमंत्री असणार की नाही?
शाह म्हणाले, “नितीश कुमार मुख्यमंत्री असतील की नाही हे मी ठरवत नाही. सध्या आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत. निवडणुकीनंतर सर्व मित्रपक्ष एकत्र बसून त्यांचा नेता ठरवतील. २०२० च्या गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला होता आणि बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री असावा यावर भर दिला होता, कारण त्यांना त्यांच्या पक्षापेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. पण आम्ही नेहमीच आमच्या युतीचा आदर केला आणि नितीश कुमार यांना मिळालेल्या आदर आणि त्यांच्या ज्येष्ठतेवरून मुख्यमंत्री बनवण्यात आलं”, असंही अमित शाह यांनी म्हटलं.
अमित शाह यांची विरोधकांवर टीका
“बिहारमधील ज्या लोकांनी लालू प्रसाद यादव यांची राजवट पाहिली, त्यांना काळ कितीही बदलला तरी पुन्हा ती लोकं नको आहेत.” काँग्रेसवर टीका करताना शाह म्हणाले की, “हा जुना पक्ष नेहमीच लहान मित्रपक्षांना तुच्छ लेखत आला आहे. इतरांना कमी लेखण्याचा आणि लहान माणण्याचा प्रयत्न करून काँग्रेस स्वतःच लहान झाली आहे, या अहंकारामुळे बिहारपासून ते बंगालपर्यंत काँग्रेसचे पाय घसरले आहेत.”