भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद व द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेत्या कनिमोळी यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे रिक्त झालेल्या त्यांच्या राज्यसभांच्या जागांवर सहा महिन्यांच्या आत निवडणुका होण्याची शक्यता आहे. यंदा अनेक आमदार देखील लोकसभा निवडणूक जिंकलेले आहेत, ते देखील आपले राजीनामे लवकरच देणार असल्याची शक्यता आहे.

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातुन लोकसभा लढवली व ५ लाख ५७ हजार ०१४ मतांनी ते विजयी झाले. अमित शहा यांनी ८ लाख ९४ हजार ६२४ मत मिळवली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार सी.जी.चावडा यांना ३ लाख ३७ हजार ६१० मत मिळाली. शहा यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली आहे. या अगोदर ते राज्यसभेचे सदस्य होते.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखीप आपली पहिली लोकसभा निवडणूक बिहारमधील पटनासाहिब मतदारसंघातून लढवली. त्यांनी माजी भाजपा नेता व निवडणुकीच्या काही दिवस अगोदर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांचा २ लाख ८४ हजार ६५७ मतांनी पराभव केला. रविशंकर प्रसाद यांना ६ लाख ७ हजार ५०६ मत मिळाली तर शत्रुघ्न सिन्हा ३ लाख २ हजार ८४९ मत मिळवू शकले. आतापर्यंत रविशंकर प्रसाद हे बिहारमधुनच राज्यसभेचे सदस्य होते.

डीएमके नेत्या मुथुवेल करुणानिधि कनिमोळी यांनी तामिळनाडूतील थुथुकुडी लोकसभा मतदार संघातुन विजय मिळवला. कनिमोझी यांना ५ लाख ६३ हजार१४३ मत मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले सौंदरराजन यांना २ लाख १५ हजार ९३४ मत मिळाली. आतापर्यंत कनिमोझी तामिळनाडूतुन राज्यसभा सदस्य होत्या.

राज्यसभेत एनडीए आघाडीच्या १०० जागा आहेत. (अमित शहा आणि रविशंकर प्रसाद यांच्या राजीनाम्या अगोदर) तर बहुमतासाठी आवश्यक असणारा १२३ आकडा गाठण्यासाठी पुढील वर्षात होणा-या महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या राज्यातील विधानसभा निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहे. पुढील वर्षीपर्यंत राज्यसभेच्या ८१ जागा रिक्त होणार आहेत. जर या तिन्ही राज्यात चांगली कामगिरी केली तरच भाजपाला राज्यसभेतील जादुई आकडा गाठता येईल.