४ जूननंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज पडणार नाही, असं विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका प्रचारसभेत बोलताना केले होते. त्यांच्या या विधानानंतर आता भाजपाकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.
नेमकं काय म्हणाले अमित शाह?
अमित शाह यांनी नुकताच एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना अरविंद केजरीवाल यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आले. यासंदर्भात बोलताना, “अरविंद केजरीवाल यांचे विधान म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. केजरीवाल त्यांना मिळालेल्या जामीनाचा कशाप्रकारे गैरवापर करत आहेत, हे यावरून दिसून येते”, अशी टीका त्यांनी केली.
पुढे बोलताना, “अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालकडे मी या निकालाकडे सामान्य निकाल म्हणून बघत नाही. हा विशेष निकाल आहे. देशातील अनेकांना वाटते आहे, की सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना विशेष वागणूक दिली आहे”, असे ते म्हणाले.
हेही वाचा- “राहुल गांधींनी मंचावर शिवरायांचा तिरस्कार…”, पंतप्रधान मोदींचा आरोप; म्हणाले, “ते चित्र पाहून मला…”
तिहार तुरुंगात असताना माझ्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी छुप्यापद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता. या आरोपालाही अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं. “अरविंद केजरीवाल खोटं बोलत आहेत. मुळात तिहार तुरुंग हे दिल्ली सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. गृहमंत्रालयाचा याच्याशी काहीही संबंध नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी सर्वोच न्यायालयाने १ जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर २ जून रोजी अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा आत्मसमर्पण करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालायाने दिले आहेत.