‘एका अपमानास्पद प्रश्नाने रचला सर्जिकल स्ट्राईकचा पाया’

भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक देशभरात झाले होते. काँग्रेसने या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितल्याने वादही रंगला होता. आता मात्र एका अपमानास्पद प्रश्नामुळे सर्जिकल स्ट्राईकचा पाया रचला गेला असा खुलासा माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्यात केला आहे.

पाकिस्तानच्या कुरापतींना आणि दहशतवादी कारवायांना उत्तर देण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राईक केला. त्याचे देशभरात कौतुक झाले, मात्र एका अपमानास्पद प्रश्नाने या सर्जिकल स्ट्राईकचा पाया रचला होता असा खुलासा माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करायचा ही योजना १५ महिन्यांपूर्वी आखण्यात आली.

४ जून २०१५ रोजी मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय सेनेला लक्ष्य केले, ज्यामध्ये १८ जवान शहिद झाले. ही बातमी मला समजल्यावर मला अतीव दुःख झाले. तसेच ही दहशतवाद्यांचा हा हल्ला मला अपमानास्पद वाटला. त्यानंतर आम्ही ८ जून २०१५ रोजी एक सर्जिकल स्ट्राईक केला ज्यामध्ये ७० ते ८० दहशतवादी ठार करण्यात आम्हाला यश मिळाले. भारतीय सैन्यदल आणि म्यानमार यांच्या सैनिकांनी या सर्जिकल स्ट्राईकची कारवाई प्रत्यक्षात अंमलात आणली.

यानंतर केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड या सर्जिकल स्ट्राईकची माहिती प्रसारमाध्यमांना देत होते, त्याचवेळी त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही अशाच प्रकारची कारवाई पश्चिम भागात करण्याची क्षमता ठेवता का? असा एक प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न मला आणि राज्यवर्धन सिंह राठोड यांना प्रचंड अपमानास्पद वाटला. त्याचमुळे आम्ही देशाच्या पश्चिम सीमेवर २९ सप्टेंबर २०१६ रोजी सर्जिकल स्ट्राईक केला. या चोख प्रत्युत्तराचा पाया मात्र जूनमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नानेच रचला असेही पर्रिकर यांनी स्पष्ट केले आहे.

सैन्यदलाच्या अतिरिक्त तुकड्यांना आम्ही विशेष प्रशिक्षण देऊन सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार केले. अत्याधुनिक शस्त्रे आणि लोकेटिंग रडार यांचा वापर पहिल्यांदा याच सर्जिकल स्ट्राईकमध्ये करण्यात आला. पाकिस्तानी सैन्यदलाची फायरिंग युनिट्स कुठे आहेत हे समजण्यासाठी भारतीय सैन्यदलाकडे असलेल्या लोकेटिंग रडारचा चांगला उपयोग झाला. ज्याच्या मदतीने पाकिस्तानच्या ४० छावण्या उद्धवस्त करण्यात मोठे यश भारताला मिळाले.

सर्जिकल स्ट्राईकबाबतचा हा  प्रश्न नेमक्या कोणत्या पत्रकाराने राज्यवर्धन राठोड यांना विचारला आणि कधी विचारला होता? या दोन प्रश्नांवर मात्र पर्रिकरांनी मौन बाळगले. उरी हल्यात भारताचे जवान शहिद झाल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. तसेच भारतीय जवानांनी राबवलेल्या या सर्जिकल स्ट्राईकची चर्चा देशभरात चांगलीच रंगली होती. काँग्रेसने या सर्जिकल स्टाईकचे पुरावे मागितल्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता सर्जिकल स्ट्राईकचा पाया नेमका कसा रचला गेला हे मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: An insulting question prompted to plan surgical strikes says parrikar