पाचशे कोटींहून अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याच्या निवृत्तीला अवघे तीन दिवस शिल्लक होते. त्यापूर्वीच हा अधिकारी जाळ्यात अडकला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोला वेंकटा रघुरामी रेड्डी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. तो पालिकेच्या नगरविकास विभागाच्या संचालक पदावर कार्यरत होता. सोमवारी रात्री एसीबीने त्याला अटक केली आहे. अटकेपूर्वी एसीबीच्या पथकाने त्याच्या घरावर आणि विशाखापट्टणम, विजयवाडा, तिरुपती आणि महाराष्ट्रातील शिर्डी येथील तब्बल १५ मालमत्तांवर छापे मारले. रेड्डी बुधवारी सेवेतून निवृत्त होणार होता. त्यानिमित्त त्याने आपले मित्र आणि नातेवाईकांसाठी जंगी पार्टीचे आयोजन केले होते. परदेशातील एका रिसॉर्टवर ही पार्टी होणार होती. त्यासाठी विमानाची तिकीटेही आरक्षित करण्यात आली होती. शिर्डीत त्याचे स्वतःचे हॉटेल आहे. विजयवाडाजवळ ३०० एकर जमीन असून इतरही मालमत्ता आहे. याशिवाय एसीबीच्या अधिकाऱ्यांना रेड्डीच्या घरात ५० लाखांची रोकड सापडली आहे. पथकातील अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून छापेमारीचे सत्र सुरू केले होते. मंगळवारीही कारवाई सुरूच होती. रेड्डीकडे अंदाजे ५०० कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. रेड्डीने केलेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhra pradesh visakhapatnam municipal department senior official arrested just three days before his retirement for amassing assets
First published on: 26-09-2017 at 11:53 IST