लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर व पश्चिम बंगालमधील दमदार कामगिरीनंतर आता तृणमुल काँग्रेसच्या आमदरांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भाजप प्रवेशाचे सत्र सुरूच आहे. आज (बुधवार) टीएमसीचे बीरभूममधील लवपुरचे आमदार मनिरूल इस्लाम यांच्यासह टीएमसीचे तीन नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.

भाजपाचे बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी त्यांचा दिल्लीत पक्ष प्रवेश करून घेतला. याशिवाय टीएमसीचे आणखी काही आमदार व पदाधिकरी देखील लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

याप्रसंगी टीएमसीचे माजी आमदार व बीरभूम टीएमसी मोर्चाचे अध्यक्ष गदाधर हाजरा यांनी देखील भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. तसेच, टीएमसीचे युवा मोर्चाचे महासचिव मो आशिफ इकबाल यांनी देखील भाजपात प्रवेश केला. मंगळवारीच टीएमसीचे दोन आमदार व सीपीएमच्या एका आमदारासह टीएमसीच्या ६० नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. यामध्ये बंगालमधील दिग्गज नेते मुकुल रॉय यांचे मुल शुभ्रांशु रॉय, तुषार कांति भट्टाचार्य आणि सीपीएमचे आमदार देवेंद्र रॉय यांचा सहभाग होता.