नवी दिल्ली : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरन यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तीन आठवडय़ांचा अंतरिम जामीन मंजूर केला. शर्मा यांच्या पत्नीवर शस्त्रक्रिया होणार असल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीतील न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. राजे बिंदल यांच्या खंडपीठाने त्यांना अंशत: दिलासा दिला.

कनिष्ठ न्यायालयाने लादलेल्या अटींनुसार शर्मा यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल असे खंडपीठाने स्पष्ट केले. शर्मा यांची पत्नी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयाने शर्मा यांच्यासाठी २७ मे रोजी वैद्यकीय प्रमाणपत्र दिले होते. यावरील पुढील सुनावणी २६ जूनला होणार आहे. त्यावेळी शर्मा यांना त्यांच्या पत्नीवरील उपचाराच्या प्रगतीसंबंधी वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त महान्यायअभिकर्ता ऐश्वर्या भाटी यांनी शर्मा यांना जामीन मंजूर करण्यास विरोध केला तर शर्मा यांच्या वकिलांनी मानवतावादी भूमिकेतून जामीन मिळावा अशी न्यायालयाकडे विनंती केली. शर्मा यांच्या पत्नीवर आधी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर प्रकृतीमध्ये गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यांची प्रकृती ढासळत असल्याची माहिती वकिलांनी न्यायालयाला दिली. अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर २१ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटकांनी भरलेले वाहन आढळले होते. त्यानंतर ५ मार्च २०२१ रोजी त्या एसयूव्ही वाहनाचे मालक व्यावसायिक हिरन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत आढळला होता. या दोन्ही प्रकरणात शर्मा यांच्यावर आरोप ठेवून त्यांना जून २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.