केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या बेताल वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांवर राज्यसभेत खजील होण्याची वेळ आली. ‘रामाला मानणारे रामजादे; तर न मानणारे ह‘राम’जादे असल्याचे तारे साध्वी निरंजन ज्योती यांनी दिल्लीतील सभेत सोमवारी तोडले होते. त्यावरून प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस व तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील अनुपस्थितीवर ‘आता काय मोदींनी राज्यसभेत येण्यासाठी व्हिसा द्यावा लागेल का’, असा संतप्त सवाल तृणमूलच्या डेरेक ओ ब्रायन यांनी केला. साध्वी निरंजन ज्योती यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी विरोधकांचे समाधान झाले नाही. साध्वी निरंजन ज्योती यांची हकालपट्टी केल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू न देण्यावर विरोधक ठाम आहेत.
साध्वी यांनी दिल्लीतील सभेत बोलताना, रामजाद्यांचे सरकार हवे आहे की रामाला न मानणाऱ्यांचे (ह‘राम’जादे), असे प्रश्नार्थक वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद मंगळवारी राज्यसभेत उमटले. साध्वींची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेस व तृणमूलच्या सदस्यांनी केली.
काँग्रेसचे आनंद शर्मा म्हणाले की, मोदींचे सहकारी अत्यंत अर्वाच्य भाषा वापरत आहेत. त्यावर कुणाचाही अंकुश नाही. त्याप्रकरणी मोदी यांनी देशवासीयांची माफी मागावी. सभागृहात सलग अनुपस्थित राहून मोदी देशवासीयांचा अपमान करीत आहेत. मंत्री बेताल वक्तव्य करतात, त्यानंतर दिलगिरी व्यक्त करतात व निघून जातात. हे चालणार नाही असे माकपचे सीताराम येचुरी यांनी स्पष्ट केले. ज्योती यांची हकालपट्टी करावी अशी मागणी बसपच्या प्रमुख मायावती यांनी केली

पंतप्रधानांना टोमणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा महिन्यांत सरासरी एकच दिवस भारतात घालवल्याची टीका काँग्रेसने केली आहे. सत्तास्थापनेनंतर सहा परदेश दौऱ्यांमध्ये मोदी यांनी नऊ देशांना भेटी दिल्या आहेत. त्यामुळे आता संसदेत येण्यासाठी मोदींना व्हिसा देण्याची गरज आहे, असा टोमणा डेरेक ओ ब्रायन यांनी लगावला.