Donald Trump on Apple’s manufacturing in India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपल कंपनीचे सीईओ टिम कूक यांना सूचना केली आहे की ‘अ‍ॅपल’ने आपल्या स्मार्टफोनचे भारतातील उत्पादन थांबवून ते अमेरिकेत सुरू करावे. यावर भारताने म्हटलं आहे की “भारत आता जागतिक मोबाइल निर्मिती केंद्र बनत आहे. तसेच कंपन्या या राजकारणाचा नव्हे तर स्पर्धात्मकतेचा विचार करून निर्णय घेतात”.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया विचारली असताना अधिकाऱ्यांनी सुरुवातीला त्यावर भाष्य करणं टाळलं, मात्र ते म्हणाले, “मेक इन इंडियामुळे उत्पादनाच्या क्षेत्रात भारत एक उत्तम भागीदार बनला आहे आणि अ‍ॅपलबाबत बोलायचं झाल्यास या कंपन्या जागतिक स्पर्धा लक्षात घेऊन निर्णय घेतात. या कंपन्या राजकीय वक्तव्यांनी प्रेरित निर्णय घेत नाहीत”. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेमुळे अ‍ॅपल कंपनी भारतातील गुंतवणूक कमी करणार नसल्याची हमी कंपनीने दिल्याचा दावा केंद्र सरकारमधील सूत्रांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की “मी अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांच्याशी बोललो आहे. अ‍ॅपलने भारतात उत्पादन करण्याऐवजी अमेरिकेत करावे, अशी सूचना मी त्यांना केली आहे. टीम कूक हे माझे मित्र असून मी नेहमीच त्यांना चांगली वागणूक दिली आहे. मात्र, त्यांची कंपनी आता भारतात उत्पादन वाढवत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. मात्र, भरत स्वतःची काळजी घेऊ शकतो. त्यामुळे माझ्या सूचनेनंतर अ‍ॅपल आता अमेरिकेतील उत्पादन वाढवणार आहे.

दरम्यान, पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांच्या टिप्पणीनंतर भारत सरकारमधील अधिकाऱ्यांनी अ‍ॅपलच्या भारतातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी अ‍ॅपलने ठामपेणं सांगितलं की, “आमच्या भारतातील उत्पादन व गुंतवणूक योजना कायम राहतील. भारत हा अ‍ॅपलचा जागतिक पुरवठा साखळीतील महत्त्वाचा भाग आहे आणि तो कायम राहील”.

आयफोन्सच्या उत्पादनात भारताचा १५ टक्के वाटा

अ‍ॅपल कंपनी जगभरात जितक्या आयफोन्सची निर्मिती करते, त्यामध्ये भारताचा १५ टक्के वाटा आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात भारतातून १.५ लाख कोटी रुपयांच्या आयफोनची निर्यात केल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एप्रिल महिन्यात केली होती. अॅपल ही देशातील सर्वांत जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीमुळे देशभरात सुमारे २ लाखांची रोजगारनिर्मिती होत आहे.