पीटीआय नवी दिल्ली

जेएनपीए बंदराला चौक या शहरातून तीन राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या सहा पदरी मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. २९.२१ किमीचा हा मार्ग असून, त्यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचा खर्च येईल.

बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर हा मार्ग विकसित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिकविषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जेएनपीए बंदरात मालवाहतुकीसाठी कंटेनरची वाढती संख्या तसेच जूनपासून सुरू होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात राष्ट्रीय महामार्ग वाढविण्याची गरज होती. सध्या पळस्पे फाटा, डी पॉइंट, कळंबोली जंक्शन तसेच पनवेल व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून अवजड वाहनांना जाण्यासाठी दोन ते तीन तासाचा कालावधी लागतो. नवी मुंबई विमानळावरून जूनपासून उड्डाण सुरू होईल असे जाहीर करण्यात आले आहे. त्यावेळी प्रत्यक्ष संपर्क मार्गाची गरज भासेल. त्यादृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा आहे.

योजनेचे स्वरूप

या योजनेची सुरुवात जेएनपीए बंदरातून (पगोटे गाव) होईल. मुंबई-पुणे महामार्गावर (एनएच-४८) यामध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला तो जोडला जाईल. या योजनेमुळे मुंबई तसेच पुणे परिसरातील उद्योगधंद्यांना बळ मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दूध उत्पादनासाठी सहा हजार कोटी

देशात दूध उत्पादनाच्या वाढीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने दोन योजनांमध्ये सुधारणा केली. त्याअंतर्गत राष्ट्रीय दुग्धविकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय गोकुळ अभियान या दोन योजनांसाठी सहा हजार १९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. दुग्ध उत्पादन, खरेदी, प्रक्रिया क्षमता, प्रयोगशाळा चाचणी सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांसाठी हा निधी खर्च केला जाईल.