लष्कराच्या जवानांनी डब्यातील सर्व जागा आपल्या सामानाने व्यापल्याचा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या त्या जवानांनी डब्यातील दोन प्रवाशांना भोसकल्याची घटना आसामच्या कामरूप जिल्ह्य़ातील रांगिया रेल्वे स्थानकावर घडली.
या प्रकरणी तीन जवान आणि लष्करातील एका कमांडिंग अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. सदर तीन जवानांची नावे सुभेदार बलवंतसिंग आणि शिपाई भूपिंदरसिंग आणि जी. सिंग अशी असून ते तिसऱ्या शीख एलआय रेजिमेण्टमधील आहेत.
जलपैगुडी येथे गुरुवारी सकाळी सदर जवान एनजेपी-मोरियानी सिपहुंग प्रवासी गाडीच्या सर्वसाधारण डब्यात चढले आणि त्यांनी आपल्याकडील सामान, खोके यांनी डब्यातील सर्व आसने व्यापून टाकली. त्यामुळे अन्य प्रवाशांना उभे राहून प्रवास करणे भाग पडले.
गाडी वाटेत प्रत्येक स्थानकावर थांबत होती आणि त्या वेळी डब्यात येणारे प्रवासी जवानांना सामान हलविण्याची विनंती करीत होते. मात्र जवानांनी आपले सामान हलविण्यास नकार दिला. गाडी रांगिया स्थानकावर आली असता डब्यात नेहमीचे प्रवासी मोठय़ा संख्येने चढले. त्या प्रवाशांनी जवानांना सामान हलविण्यास सांगितले.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जवानांनी आपल्याजवळील चाकू काढला आणि दोघा प्रवाशांवर वार केले. त्यामध्ये एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. या प्रवाशाचे नाव कामेश्वर कालिता असे असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, काही प्रवाशांनी जवानांना मारहाण करून त्यांच्याकडील सामान हिसकावण्याचा प्रयत्न केला  तेव्हा बाचाबाचीला सुरुवात झाली, असे लष्कर पोलीस प्रमुखाने सांगितले.