Asaduddin Owaisi Says Arrest Nupur Sharma: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाने देशातील २० कोटी अल्पसंख्यांक मुस्लिमांविरोधात जे द्वेषाचं वातावरण निर्माण केलं आहे त्यामुळेच त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अशाप्रकारची वायफळ बडबड करत असल्याचा टोला एमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लगावलाय. नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ओवेसी यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलच्या अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी अटक करवी अशीही मागणी केलीय.

नक्की वाचा >> प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: “देवेंद्र फडणवीसांनी कॉल केला आणि म्हणाले, बेटा…”; नुपूर शर्मांच्या मुलाखतीचा Video चर्चेत

ओवेसी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काही दिवासांपूर्वीच आपण भिवंडीच्या सभेमध्ये पक्ष प्रवक्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी केल्याची आठवण करुन दिली. “भाजपाच्या प्रवक्त्यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्यानंतर १० दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई करतात. भिवंडीमधील माझ्या भाषणात मी पंतप्रधानांना आवाहन केलेलं की, तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात. इथं २० कोटी मुस्लीम राहतात. ते भारताचे नागरिक आहेत. तुम्ही तुमच्या मुख्य प्रवक्त्यांविरोधात कारवाई करा. पण तुम्ही कारवाई केली नाही,” असं ओवेसी म्हणाले.

“१० दिवसांनी तुम्ही कारवाई केली. का केली तर देशाचे उपराष्ट्रपती विमानात आहेत ते कतारमध्ये लॅण्ड करणार आहेत. तेव्हा कतारने उपराष्ट्रतींचा कार्यक्रम रद्द करण्याचा इशारा दिला. तेथील सरकारने भारतीय राजदूतांना बोलवून तुमच्या देशातील भाजपाच्या प्रवक्त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचं सांगितलं. यापेक्षा मोठा अपमान नाहीय भारताचा,” असा टोला ओवेसींनी भाजपावर निशाणा साधताना लगावला. आपले उपराष्ट्राध्यक्ष एका देशाच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याच देशामध्ये तेथील सरकार आपल्या राजदूतांना बोलावून इशादा देते, हे खेदजनक आहे, असंही ओवेसी म्हणाले.

पुढे बोलताना ओवेसी यांनी नुपूर शर्माच्या अटकेची मागणी केली. “मोदींनी हे समजून घेण्याची गरज आहे की तुमचा पक्ष भारतात अल्पसंख्यांक मुस्लिमांविरोधात एक द्वेषाचं वादळ निर्माण करत आहे. तुम्ही भारतातील मुस्लिमांविरोधात युद्धाची घोषणा केलीय. त्यामुळेच तुमच्या पक्षाचे प्रवक्ते वाटेल तसं बोलत आहेत. त्यांचं केवळ निलंबित करुन भागणार नाही. जर भाजपाला वाटतं की त्यांच्या प्रवक्त्यांनी पक्षाच्या विचारसणीच्याविरोधात भाष्य केलंय तर त्यांना अटक करा,” असं ओवेसी म्हणालेत.

“ट्विटर आणि फेसबुकवर पंतप्रधान मोदींबद्दल काहीही बोलणारे व्हिडीओ कोणी पोस्ट केले तर तुम्ही त्यांना २४ तासांमध्ये अटक करता,” असं म्हणत ओवेसींनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली.