नोटाबंदीनंतर लोकांकडे असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बॅंकांमध्ये भरण्यात आल्या. त्यावेळी जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देण्यात आल्या किंवा जुन्या नोटा  भरल्यानंतर त्या खात्यांमध्ये ठेवीच्या रुपात राहिल्या. यापूर्वी कधीही भरली गेली नाही इतकी रक्कम खात्यांमध्ये भरण्यात आली. बहुतांश खात्यातील उत्पन्न आणि रक्कम यांचे प्रमाण योग्य आहे असे सरकारला जाणवले तर काही खात्यांमध्ये गोंधळ असल्याचा संशय सरकारला आला.  ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम असलेली एकूण १८ लाख प्रकरणे आहेत अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल लोकसभेत दिली.

आपल्या देशामध्ये अशी एकूण १८ लाख खाती आहेत ज्यामध्ये उत्पन्न आणि ज्ञात स्रोतांचा ताळमेळ बसत नसल्याचे अधिकाऱ्यांची लक्षात आले आहे. या सर्व खातेदारांची चौकशी होणार असून त्यांनी योग्य उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले. या खात्यांमध्ये उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम आहे असे जाणवल्यानंतर आयकर विभागाने संबंधित व्यक्तींना याबाबत विचारणा करण्यात आली आहे. काही जणांचे उत्तर देखील आले आहे. ज्यांनी उत्तरे पाठवली नाहीत त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे असे जेटलींनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये स्पष्ट केले.

८ नोव्हेंबरला आपल्या देशामध्ये नोटाबंदी करण्यात आली. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रातोरात बंद करण्यात आल्या. जुन्या नोटा बॅंकांमध्ये बंद करण्यात आल्या. त्यावेळी काही खात्यांमध्ये उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम भरण्यात आली. सरकारने सुरू केलेल्या जनधन योजनेच्या खात्यांमध्येही मोठ्या प्रमाणात रक्कम भरण्यात आली. त्या खात्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जास्तीत जास्त व्यवहार डिजीटल व्हावे याची विनंती त्यावेळी सरकारकडून करण्यात आली. पेटीएम, कार्ड पेमेंट किंवा भीम अॅप सारख्या साधनांनी सर्व व्यवहार होऊ लागले. नोटाबंदीनंतर ऑनलाइन व्यवहारांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली. परंतु, डिजीटल व्यवहार हे सुरक्षित आहेत का असा प्रश्न जेटलींनी विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले. भारतामध्ये ऑनलाइन व्यवहारांविषयी मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण झाली आहे. परंतु हे डिजीटल व्यवहारांमध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता देखील आहे. काही वेबसाइट हॅकर्सकडून हॅक होऊ शकतात असे ते म्हणाले. त्यामुळे आम्ही या क्षेत्रातील तज्ञांची सेवा घेणार असून सर्वांचे ऑनलाइन व्यवहार सुरक्षित कसे राहतील याकडे लक्ष देणार आहोत असे जेटलींनी म्हटले.