कौतुकाआडून भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न
दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचारावरून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना धारेवर धरणाऱ्या ‘आप’ने आता क्रिकेटपटू विराट कोहली याच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी विराट याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा आधार घेण्यात आला आहे. तसेच, संघटनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणणारा जागल्या म्हणून ‘आप’ने त्याचे कौतुक करत भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.
विराटला दिल्लीच्या १४ वर्षे वयोगटाखालील संघात खेळण्याची इच्छा होती. परंतु, त्याची निवड होऊ शकली नाही. परंतु, दिल्ली क्रिकेट संघटनेतील कुणाची तरी कृपादृष्टी झाल्यास संघात स्थान मिळू शकते, असे आपल्या वडिलांना सांगण्यात आले. परंतु, हा पर्याय त्यांनी फेटाळून लावला. पुढल्याच वर्षी आपली गुणवत्तेच्या जोरावर संघात निवड झाली, अशा आशयाची मुलाखत त्याने एका वृत्तपत्राला दिली होती. तिचाच आधार घेत ‘आप’ने जेटली यांच्या विरोधात नव्या आरोपांचा भडीमार केला. संघात निवड करण्यासाठी दिल्ली क्रिकेट संघटनेतील कुठल्या व्यक्तीने विराटच्या वडिलांकडे लाभाची मागणी केली होती, विराटच्या वडिलांनी संबंधित व्यक्तीच्या मागणीला नकार दिल्यानंतर त्याची संघात का निवड होऊ शकली नाही, असे सवाल ‘आप’ने जेटली यांना विचारले आहेत.
काही दिवसांपासून या प्रकरणावरून दोन्हीही पक्षांदरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आपल्यावरील आरोप निराधार असल्याचा दावा जेटली यांनी केला आहे. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणी माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रम्हण्यम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्यात आला आहे. त्याच्याही वैधतेवरून आप आणि भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2016 रोजी प्रकाशित
विराट हा जागल्या – आप
काही दिवसांपासून या प्रकरणावरून दोन्हीही पक्षांदरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 01-01-2016 at 04:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arun jaitley trying to defence indian cricketer