दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर १ कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीय राजकारण्यांच्या यादीत केजरीवाल दुसऱ्या स्थानावर आहेत. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या अडीच कोटींहून अधिक आहे.

अरविंद केजरीवाल यांनी नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीय राजकारण्यांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला. ‘समाज माध्यमांवर अरविंद केजरीवाल लोकप्रिय आहेत. फेसबुक लाईव्हसारख्या कार्यक्रमांमुळे त्यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. केजरीवाल यांचे व्हिडीओदेखील युट्युबवर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात,’ असे आम आदमी पक्षाच्या एका स्वयंसेवकाने म्हटले आहे.

केजरीवाल वारंवार ट्विटरच्या माध्यमातून वारंवार शरसंधान साधत असतात. अनेकदा केजरीवाल त्यांच्या ट्विटमुळे मोदी आणि भाजपच्या रडारवर आले आहेत.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजदेखील ट्विटरवर अतिशय सक्रीय असतात. स्वराज यांच्या फॉलोअर्सची संख्या ६६ लाख ९० हजार इतकी आहे. सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन अनेकांना मदत केली आहे. याशिवाय काँग्रेसचे नेते शशी थरुरदेखील ट्विटरवर सक्रीय असतात. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ४७ लाख २० हजार आहे.