scorecardresearch

भारतीय मुस्लिमांचं मुघलांशी कोणतंही नातं नाही, पण मुघल राजांच्या बायका कोण होत्या? : असदुद्दीन ओवेसी

भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी कोणतंही नातं नाही, मात्र मुघल राजांच्या बायका कोण होत्या? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केलाय.

Asaduddin-Owaisi-1
एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन औवैसी (संग्रहीत छायाचित्र)

देशभरात वेगवेगळ्या मशिदींवरून वाद सुरू आहे. मुघलांनी मंदिरं पाडून त्या जागेवर मशिदी बांधल्याचा आरोप केला जात आहे. त्यातून मुस्लीम विरोधी वातावरण निर्माण केला जात असल्याचा आरोपही होतोय. अशातच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारतीय मुस्लिमांबाबत मोठं विधान केलं. भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी कोणतंही नातं नाही, मात्र मुघल राजांच्या बायका कोण होत्या? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केलाय. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत हे मत व्यक्त केलं.

असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या अन्य एका व्हिडीओ ट्वीटमध्ये म्हटलं, “आसाममध्ये पुरामुळे ७ लाख लोकांवर परिणाम झालाय, १८ लोकांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, आसामच्या मुख्यमंत्र्यांना आसामच्या जनतेच्या त्रासाशी काहीही देणंघेणं नाही. त्यांना मदरशांची काळजी वाटते आहे. इतिहासाचा कमकुवत विद्यार्थी असलेल्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की जेव्हा संघी लोक इंग्रजांशी हातमिळवणी करत होते आणि तुरुंगात इंग्रजांकडे माफीची भीक मागत होते, तेव्हा याच मदरशांच्या लोकांनी इंग्रजांच्या विरोधात जिहादचा फतवा काढला होता.”

“याच मदरशांमधून शिकणाऱ्या लोकांनी इंग्रजांविरोधात लढताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भाजपा आणि संघाच्या लोकांमध्ये न्यूनगंड आहे त्यामुळे ते मदरशांबाबत अशाप्रकारची वक्तव्य करत असतात. राजाराम मोहन राय मदरशांमध्ये शिकले होते, की शाखांमध्ये शिकले होते? संघाच्या शाखांमध्ये आणि मदरशांमध्ये फरक आहे. मदरशांमध्ये माणुसकीचे धडे शिकवले जातात. मदरशांमध्ये विज्ञान, गणित सर्व विषय शिकवले जातात,” असं मत असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या त्या १५०० हिंदूंसाठी कोण अश्रू ढाळणार?” The Kashmir Files वरुन ओवेसींचा मोदी सरकारला सवाल

“मदरशांच्या मदतीनेच भारताला अधिक सुंदर बनवण्यात आलं. त्यांना या गोष्टी माहिती नाही. नरेंद्र मोदी यांचं सरकार मदरशांचं आधुनिकीकरणाची योजना चालवत नाहीये का? दरवर्षी मदरशांसाठी निधी मंजूर होत नाही का? त्यांना केवळ मुस्लिमांचा आणि मुस्लीम धर्माचा राग आहे. त्यांच्या तोंडातून हे बाहेर आलं आहे,” असंही ओवेसी यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asaduddin owaisi criticize bjp rss over targeting muslims in india pbs

ताज्या बातम्या