‘आपण अमेरिकेला काहीच का बोलू शकत नाही?’ असा सवाल उपस्थित करत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला धडा शिकवला. भारतीय फौजांनी पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीत हवाई हल्ले केले. पाकिस्तानला वठणीवर आणलं. पण शस्त्रविरामाची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळे त्यावरून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. याचसंदर्भात आता असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर टीकास्र सोडलं आहे.
पहलगाम हल्ला व त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरसंदर्भात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा चालू आहे. सोमवारी चर्चेच्या पहिल्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक प्रमुख नेते व खासदारांनी आपापली भूमिका मांडली. यामध्ये एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला परखड सवाल केले.
लोकसभेत काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?
असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी पाकिस्तानशी सर्व व्यवहार बंद असतानादेखील आपण आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानशी क्रिकेट सामना कोणत्या तोंडाने खेळतोय? असा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर भारत व पाकिस्तान यांच्यातील संघर्षात अमेरिकेनं शस्त्रविराम कसा जाहीर केला? असा सवालदेखील असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.
“तुम्ही सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट केलं. पण त्यानंतरही पहलगाम हल्ला झाला. याचा अर्थ तुमचं धोरण पूर्णपणे अयशस्वी ठरलं आहे. तुम्ही ३७० हटवलं, एक सरकार बदलून तो केंद्रशासित प्रदेश केला. पण त्यानंतरही तिथे दहशतवादी घुसले”, असं ते म्हणाले.
“व्हाईट हाऊसमध्ये बसून कुणीतरी…”
ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा करण्यावर ओवैसींनी तीव्र संताप व्यक्त केला. “राज्यघटनेच्या प्रतिज्ञेत सार्वभौमत्व हा शब्द आहे. याचा अर्थ आपण आपल्या देशाबद्दलचे निर्णय घेण्यासाठी समर्थ आहोत. पण कुणीतरी एक माणूस व्हाईट हाऊसमध्ये बसून शस्त्रविरामाची घोषणा करणार का? याचं वाईट वाटतं. जर तिथे अंकल सॅम शस्रविरामाची घोषणा करत असेल, तर आपल्या सैन्यावर त्याचा काय परिणाम होईल? वैमानिकांवर काय परिणाम होईल? जो नौदलाचा सैनिक समुद्रात उभा राहून सीमेचं रक्षण करतोय, त्याला हे कळत नाहीये की माझ्या पंतप्रधानांनी शस्त्रविरामाची घोषणा का केली नाही?” असं ओवैसी म्हणाले.
“आपण अमेरिकेला काही बोलूही शकत नाही”
“अमेरिकेशी आपले मित्रत्वाचे संबंध आहेत. मग ते मैत्री निभावत आहेत का? मी काही उदाहरणं देतो. क्रुश्चेव्हनं दबाव टाकल्यानंतरही टिटोने सांगितलं की मी ते मानणार नाही, मी ‘नाम’मध्ये सहभागी होणार. फ्रान्सच्या डिगॉलवर अमेरिकेने जेव्हा असाच दबाव टाकला, तेव्हा डिगॉलने सांगितलं की तुम्ही मित्र आहात, पण आमचं धोरण ठरवण्यासाठी आम्ही स्वतंत्र आहोत. व्हिएतनाम २० वर्षे अमेरिकेशी लढलं, पण त्यांच्यासमोर झुकलं नाही. पण आपण मात्र अमेरिकेला काही बोलूही शकत नाही आहोत”, असं ओवैसी म्हणाले.
पाकिस्तानला FATF समोर आणण्याची मागणी
दरम्यान, यावेळी ओवैसींनी पाकिस्तानला FATF समोर आणण्याची मागणी केली आहे. “पाकिस्तानला FATF मध्ये आणावंच लागेल. जर तुम्ही विश्वगुरू आहात, तर आम्ही आव्हान देतोय. तुम्ही जी-७ देश, जीसीसी आणि अंकल सॅमला राजी करा की पाकिस्तानला FATF मध्ये पुन्हा एकदा आणलं जावं. पाकिस्तान दहशतवादी कारवाया करणार. तुम्ही तयार व्हा. जेव्हा गलवान झालं तेव्हा ट्रम्पनं म्हटलं होतं की मी मध्यस्थी करेन. आपण तेव्हा सांगितलं होतं की त्याची गरज नाही. पण आज ट्रम्प आपल्याही आधी गोष्टी जाहीर करत आहेत”, असं ओवैसी म्हणाले.