Asaduddin Owaisi Slams Pakistan: खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासह सौदी अरेबिया दौऱ्यावर असलेल्या एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर पुन्हा एकदा कठोर शब्दांत टीका केली आहे. यावेळी रियाध येथे ओवैसी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “केवळ या पावलाद्वारेच आपण दहशतवाद्यांना पुरवला जाणारा निधी थांबवू शकतो. पाकिस्तानमध्ये दहशतवादी मुक्तपणे फिरत आहेत. अमेरिकेने घोषित केलेला दहशतवादी पाकिस्तानच्या फील्ड मार्शलसोबत बसलेला दिसतो. पाकिस्तानचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आहे, याचा आणखी कोणता पुरावा हवा आहे?”
सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये बोलताना एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “पाकिस्तानला पुन्हा एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये आणले पाहिजे. याद्वारेच आपण या सर्व दहशतवादी संघटनांना होणाऱ्या निधीच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवू शकू.”
असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले की, “जेव्हा या व्यक्तीला (असिम मुनीर) पाकिस्तानमध्ये फील्ड मार्शल बनवण्यात आले, तेव्हा अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केलेला मोहम्मद एहसान फील्ड मार्शलच्या शेजारी बसलेला दिसतो. या फील्ड मार्शलशी हस्तांदोलन करतानाचे त्याचे फोटो आहेत. हे पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांतील सहभागाचे स्पष्ट पुरावे आहेत. हे दहशतवादी गट तिथे भरभराटीला येत आहेत. त्यांना तिथे प्रशिक्षण दिले जात आहे. भारतात अधिक हिंदू मुस्लिम दंगली घडवायच्या आणि भारताला अस्थिर करायचे एवढेच त्यांचे काम आहे.”
पाकिस्तानचा खोटा प्रचार
यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानच्या खोट्या प्रचारावरही टीका केली. पाकिस्तान स्वतःला मुस्लिम देशांचे रक्षक म्हणवतो आणि भारताविरुद्ध द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतो यावरही ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “भारतात सुमारे २४ कोटी मुस्लिम राहतात आणि ते स्वाभीमानी भारतीय आहेत. भारत मुस्लिम देश नसल्यामुळे तेथिल मुस्लिमांचे नुकसान करत आहे, अशा प्रकारचा खोटा प्रचार पाकिस्तान करत आहे.”
…तर दक्षिण आशियात स्थिरता येऊ शकते
आपल्या भाषणाच्या शेवटी असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “जर पाकिस्तानने या दहशतवादी संघटनांना पोसणे थांबवले तर दक्षिण आशियात स्थिरता येऊ शकते. यामुळे संपूर्ण प्रदेशात प्रगती आणि विकासाला चालना मिळेल. परंतु दुर्दैवाने, पाकिस्तान अजूनही दहशतवादाच्या मार्गावर चालत आहे आणि भारताला अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहे.”