केनियामधील एका महाविद्यालयाच्या आवारात काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बेछूट गोळीबार केला. त्यात काही विद्यार्थ्यांसह १५ जण ठार झाले, तर २९ जण जखमी झाले. हा हल्ला सोमाली दहशतवाद्यांनी केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
गुरुवारी सकाळी या महाविद्यालयात वर्ग सुरू असताना अचानक या बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. काही विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात उभे होते. गोळीबार सुरू झाल्यानंतर त्यांची धावाधाव झाली आणि महाविद्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येक जण जीव वाचविण्यासाठी धडपडत होता.
‘‘मी महाविद्यालयाच्या आवारात असताना पाच बुरखाधारी व्यक्ती आल्या आणि त्यांनी जोरदार गोळीबार केला. या गोळीबारात मी जखमी झालो. पण जिवाच्या आकांताने मी धावत वर्गात गेलो,’’ असे या गोळीबारात वाचलेल्या अलांगा घाबरलेल्या अवस्थेत सांगत होता. या हल्ल्यानंतर पोलीस व केनियाच्या सैन्य दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी दहशतवाद्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.