Ramesh Bidhuri on CM Atishi: भाजपाचे माजी खासदार आणि कालकाजी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या, दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि कालकाजी विधानसभेतील प्रतिस्पर्धी उमेदवार आतिशी मार्लेना सिंह यांच्यावर बिधुरी यांनी टीका केली आहे. एका जाहीर सभेत बोलत असताना बिधुरी यांनी केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर टीका केली. “आतिशी आधी मार्लेना होत्या, आता त्या सिंह झाल्या आहेत. त्यांनी स्वतःचा बापच बदलला. आतिशी यांच्या वडिलांनी अफझल गुरूची फाशी रोखण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवादी अफझल गुरूमुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला होता”, असे रमेश बिधुरी म्हणाले.

रमेश बिधुरी यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. “मी निवडून आलो तर प्रियांका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवेन”, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर जोरदार टीका झाल्यानंतर बिधुरी यांनी दिलगिरी व्यक्त केली. “माझ्या शब्दांमुळे जर माता-भगिनींना किंवा कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. मी महिलांचा आदर करतो. पण काँग्रेस आणि आम आदमी पक्षानेही त्यांच्या ढासळत्या राजकीय स्थितीकडे पाहिले पाहीजे”, असे बिधुरी म्हणाले.

दरम्यान ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी या विधानाचा निषेध केला असून भाजपाच्या नेत्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याची टीका केली. माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “भाजपाच्या नेत्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल अतिशय घाणेरडे विधान केले आहे. दिल्लीची जनता एका महिला मुख्यमंत्र्यांचा अवमान सहन करणार नाही. दिल्लीमधील सर्व महिला या अवमानाचा बदला घेतील.”

आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या प्रियांका कक्कर यांनीही बिधुरी यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला. त्या म्हणाल्या, एका महिला मुख्यमंत्र्यांबाबत भाजपाचे नेते इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरत आहेत. विचार करा बिधुरी चुकून आमदार झाले तर सामान्य महिलांना ते काय वागणूक देतील. दिल्लीतील महिलांनी डोळे झाकून त्यांचा मुलगा आणि भाऊ (केजरीवा) यांना पाठिंबा दिला, म्हणून भाजपा महिलांचा अवमान करत आहे, अशीही टीका प्रियांका कक्कर यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली विधानसभेसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार असून काँग्रेस, भाजपा आणि विद्यमान सत्ताधारी आम आदमी पक्षात तिरंगी लढत होणार आहे.