संतापाच्या भरात अनेक राजकीय नेतेमंडळींची जीभ घसरल्याच्या घटना आजतागायत घडल्या आहेत. यामुळे ही नेतेमंडळी अनेकदा अडचणीत सापडल्याचंही पाहायला मिळालं आहे. पण भाजपाच्या एका खासदार महोदयांनी भर लोकसभेत केलेली शिवीगाळ देशाच्या संरक्षणमंत्र्यांना निस्तरावी लागल्याचा प्रकार शुक्रवारी लोकसभेत पाहायला मिळाला. भाजपा खासदार रमेश बिधुरी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या भाषेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

१८ ते २१ सप्टेंबर या कालावधीमध्ये लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक व नव्या संसद भवनातून कामकाजाला सुरुवात या दोन प्रमुख गोष्टी घडल्या. त्याशिवाय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चांद्रयान ३ मोहिमेवरही दोन्ही बाजूच्या सदस्यांनी कौतुक करणाऱ्या भूमिका मांडल्या. मात्र, याचवेळी काही सदस्य आक्रमक झाल्याचंही दिसून आलं. भाजपाचे दक्षिण दिल्लीतील खासदार रमेश बिधुरी हे त्यातलेच एक. बिधुरींनी आपल्या भाषणात चक्क शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

काय आहे हा व्हिडीओ?

हा व्हिडीओ लोकसभेमधला असून यात भाजपा खासदार रमेश बिधुरी भाषण करताना दिसत आहेत. चांद्रयान मोहिमेचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाटल्याचा आरोप विरोधी बाकांवरून करण्यात आल्यानंतर त्यावर बिधुरी चांगलेच भडकले. रागाच्या भरात त्यांनी थेट शिवीगाळ करायला सुरुवात केली. हे सगळं हे बिधुरी बसपाचे खासदार दानिश अली यांना उद्देशून म्हणत असल्याचं सांगितलं जात आहे.

काय म्हणाले रमेश बिधुरी?

रमेश बिधुरी यांनी आपल्या भाषणात मोदींनी श्रेय लाटलं नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, यावर विरोधी बाकांवरून काही टिप्पणी होऊ लागताच बिधुरी भडकले. “मोदीजी श्रेय घेत नाहीयेत. श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. ए भ**…ए उग्रवादी..बोलू देणार नाही तुला कधी उभं राहून. सांगून ठेवतोय. ए उग्रवादी..कठुवे…हे दहशतवादी आहेत… उग्रवादी आहेत.. हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचं काही ऐकू नका, बाहेर फेका याला”, असं रमेश बिधुरी म्हणत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, बिधुरी यांच्या मागच्याच रांगेत बसलेले माजी केंद्रीय आरोग्यमंत्री व भाजपा खासदार हर्ष वर्धन त्यांच्या बोलण्यावर हसत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Video: “कॅनडाच्या संसदेत भारतावर आरोप करण्याचा निर्णय…”, जस्टिन ट्रुडोंनी दिलं स्पष्टीकरण…

राजनाथ सिंह यांची माफी

दरम्यान, रमेश बिधुरी यांच्या विधानांवरून विरोधी पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. “जर (सत्ताधारी) सदस्यांच्या कोणत्याही विधानामुळे विरोधी पक्षांच्या भावना दुखावल्या अशतील, तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो’, असं राजनाथ सिंह म्हणाले.