अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी आम आदमी पक्षाने आतिशी मार्लेना यांची एकमुखाने निवड केली होती. त्यानंतर आतिशी यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान, पदभार स्वीकारताना आतिशी यांच्या बाजुला एक रिकामी खुर्ची ठेवण्यात आली. त्यामुळे त्यांच्या कृतीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी माध्यमांशी बोलताना यामागचं कारणही सांगितलं आहे.

यासंदर्भात बोलताना आतिशी म्हणाल्या, “ज्याप्रमाणे रामायणात भरत यांनी प्रभू श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेऊन १४ वर्ष राज्य केलं, त्याप्रमाणे मीसुद्धा पुढचे चार-पाच महिने सरकार चालवणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या सन्मानार्थ मी हा निर्णय घेतला आहे.” पुढे बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पुन्हा विजय मिळेल अशा विश्वासही व्यक्त केला. “मी केवळ आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री असणार आहे. या निवडणुकीत दिल्लीतील जनता पुन्हा आम आदमी पक्षाला बहुमताने निवडून देईल आणि अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होतील”, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा – Atishi : दिल्लीचा कारभार आतिशी यांच्या हाती; ‘या’ १६ महिला मुख्यमंत्र्यांनी केलंय विविध राज्यांचं नेतृत्व

भाजपाकडून टीका

दरम्यान, आतिशी यांच्या या निर्णयानंतर भाजपाकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. “हा प्रकार म्हणजे संविधानाचा अपमान आहे. यावरून दिल्लीचे सरकार आतिशी नाही, तर अरविंद केजरीवाल रिमोट कंट्रोलद्वारे चालवतील, हे सिद्ध झालं आहे. हा संविधानाबरोबरच मुख्यमंत्री पदाचाही अपमान आहे“, अशी प्रतिक्रिया दिल्ली भाजपाचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी दिली.

हेही वाचा – अरविंद केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतिशी कोण आहेत?

आतिशी या आम आदमी पार्टीमधील वरिष्ठ नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. त्याचदरम्यान, आतिशी या केजरीवाल व इतर नेत्यांच्या संपर्कात आल्या. पुढे त्यांनी आम आदमी पार्टीद्वारे राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्या दिल्लीतल्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी दिल्लीच्या शिक्षण मंत्रालयासह, सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री म्हणून देखील काम केलं आहे. त्या आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्य देखील आहेत.आतिशी यांची आता दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली आहे.