Macron pushes for Rafale: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एका पोस्टमध्ये युरोपीय देशांना अप्रत्यक्षपणे अमेरिकी लढाऊ विमानांवरील अवलंबित्वा कमी करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर, धोरणात्मक स्वायत्ततेकडे वाटचाल करण्यासाठी फ्रान्सचे राफेल हे एक पर्याय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मॅक्रॉन यांच्या पोस्टमध्ये मोबाईल इंटरफेसवर राफेल जेट दाखवण्यात आले असून, त्याच्या कॉल बॅनरवर “आपला युरोप सुरक्षित करा” असे लिहिले आहे. यावेळी मॅक्रॉन यांनी या पोस्टला “युरोपियन मित्रांनो, तुमच्यासाठी कॉल आहे” असे कॅप्शन दिले आहे.

मॅक्रॉन यांनी या पोस्टबद्दल सविस्तर माहिती दिली नसली, तरी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, युरोपीय लष्करी उपकरणांची खरेदी आणि अमेरिकन तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करून सामूहिक संरक्षण मजबूत करण्यासाठी नाटोसह युरोपीय देशांना केलेले हे आवाहन म्हणून याकडे पाहिले जात आहे.

युरोपमधील अनेक देश त्यांच्या सुरक्षा गरजा भागवण्यासाठी अमेरिकेत बनवलेल्या लष्करी उपकरणांवर गेल्या अनेक दशकांपासून अवलंबून आहेत. यावर पर्याय म्हणून, युरोपीय धोरणात्मक स्वायत्ततेचे मोठे समर्थक असलेले मॅक्रॉन यांनी मार्च महिन्यातही हा मुद्दा पुढे आणला होता.

“आपण अमेरिकन उपकरणांची सवय असलेल्या देशांना युरोपियन पर्याय दिले पाहिजेत. या प्रणालींचे उत्पादन वाढवल्याने खर्च कमी होईल आणि संपूर्ण युरोपमध्ये एक स्वयंपूर्ण संरक्षण जाळे तयार होईल,” असे फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी पत्रकारांना सांगितले होते.

राफेल विरुद्ध यूएस एफ-३५ जेट

अलिकडच्या काही वर्षांत पोलंड आणि फिनलंड सारख्या देशांनी लॉकहीड मार्टिनने अमेरिकेत बनवलेल्या पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमानांचा पर्याय निवडला आहे. २०२० मध्ये पोलंडने ३२ एफ-३५ साठी ४.६ अब्ज डॉलर्सचा करार केला होता, तर २०२१ मध्ये फिनलंडने अशा ६४ विमानांची ऑर्डर दिली होती.

राफेल हे फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनने विकसित केलेले ४.५ पिढीचे लढाऊ विमान आहे आणि ते हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. भारताने अलिकडेच पाकिस्तानशी झालेल्या लष्करी संघर्षादरम्यान दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी या विमानांचा वापर केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, अमेरिकेच्या एफ-३५ लढाऊ विमानांमध्ये गुप्त वैशिष्ट्ये, प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि सेन्सर्सचा समावेश आहे.