scorecardresearch

भारताच्या लोकशाहीवर हल्ला, राहुल गांधी यांची ‘केंब्रिज’मधील व्याख्यानात टीका

‘लर्निग टू लिसन इन द ट्वेन्टीफर्स्ट सेंच्युरी’ या विषयावर व्याख्यान देताना राहुल यांनी केलेल्या विधानांवर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली.

dv rahul gandhi kembridge
भारताच्या लोकशाहीवर हल्ला, राहुल गांधी यांची केंब्रिजमध्ये टीका

पीटीआय, लंडन : भारतातील लोकशाहीवर हल्ला होत आहे आणि आपल्यासकट अनेक राजकीय नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंब्रिजमध्ये बोलताना केला. राहुल गांधी हे केंब्रिज विद्यापीठाचे व्हिजिटिंग फेलो आहेत. तिथे ‘लर्निग टू लिसन इन द ट्वेन्टीफर्स्ट सेंच्युरी’ या विषयावर व्याख्यान देताना राहुल यांनी केलेल्या विधानांवर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली.

हेरगिरीसाठी वापरले जाणारे इस्रायलचे ‘पेगासस’ हे स्पायवेअर आपल्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या फोनमध्ये टाकण्यात आले होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तुम्ही फोनवर बोलत असताना खबरदारी घ्या, कारण आम्ही तुमचे बोलणे रेकॉर्ड करत आहोत, असे आपल्याला काही गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा राहुल यांनी या वेळी केला. याबाबत आम्ही सातत्याने तणावात आहोत, असे ते म्हणाले. तपास यंत्रणा आणि पोलिसांकडून वेळोवेळी होणारी चौकशी, आपल्याविरोधात चालवले जाणारे खटले याचाही उल्लेख राहुल गांधी यांनी केला. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी स्वरूप नसलेल्या प्रकरणांमध्ये गुन्हेगारी खटले चालवले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. या वेळी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेविषयीही माहिती दिली. पूर्वग्रह, बेरोजगारी आणि वाढती असमानता याविरोधात ही यात्रा होती, असे त्यांनी सांगितले.

राहुल यांच्या टीकेमुळे भाजपचे नेते संतप्त झाले असून सातत्याने निवडणुकांत पराभूत झाल्यामुळे नैराश्यातून राहुल परदेशात देशाची प्रतिमा कलंकित करत आहेत, अशी टीका पक्षाने केली.  मोदींना जगभरात जो आदर मिळत आहे,  त्यांच्या नेतृत्वात भारताने जे स्थान प्राप्त केले आहे,  त्याबाबत राहुल यांनी  निदान इटलीच्या पंतप्रधानांचे तरी ऐकायला हवे, अशी  टीका अनुराग ठाकूर यांनी केली.

‘पाच मार्गानी हल्ले’

माध्यमे आणि न्यायपालिका ताब्यात घेणे आणि त्या नियंत्रणात ठेवणे, पाळत ठेवणे आणि दहशत, केंद्रीय कायदा अंमलबजावणी संस्थांकडून धाकदपटशा, अल्पसंख्याक, दलित व आदिवासींवर हल्ला आणि मतभेदांचे आवाज बंद करणे हे भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याची पाच मुख्य वैशिष्टय़े आहेत, असे राहुल यांनी या वेळी सांगितले.

राहुल यांचा पंतप्रधानांबद्दलचा द्वेष समजू शकतो, पण परदेशी मित्रांच्या मदतीने परदेशात भारताची प्रतिमा कलंकित करण्याच्या कारस्थानामुळे काँग्रेसच्या अजेंडय़ाविषयी प्रश्न उपस्थित होतात.

– अनुराग ठाकूर, माहिती आणि प्रसारणमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 00:02 IST