हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे रामस्वरूप शर्मा यांच्याविरोधात काँग्रेसचे आश्रय शर्मा यांच्यात सामना आहे. मात्र खरी लढाई मुख्यमंत्री जयराम ठाकूर विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांच्यात आहे. आश्रय हे सुखराम यांचे नातू आहेत. माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते वीरभद्र सिंह व त्यांच्या पत्नी प्रतिभा यांनी मंडीतून विजय मिळवला आहे. गेल्या वेळी भाजपच्या रामस्वरूप शर्मा यांनी चाळीस हजारांच्या फरकाने प्रतिभा यांना पराभूत केले होते. आता राज्यात भाजपची सत्ता आहे. रामस्वरूप शर्मा यांना मतदारांच्या नाराजीला तोंड द्यावे लागत आहे. रामस्वरूप यांनी घराणेशाहीचा मुद्दा प्रचारात घेतला आहे. मात्र त्यांची भिस्त मुख्यमंत्र्यांवर आहे. मंडी हा जयराम ठाकूर यांचा जिल्हा आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. आश्रय यांची ही पहिलीच निवडणूक. त्यांचे वडील अनिल शर्मा हे राज्यात मंत्री होते. मात्र आश्रय यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. मंडीत आतापर्यंत १५ पैकी ११ वेळा काँग्रेसने यश मिळवले आहे. त्यामुळे सुखराम व वीरभद्र सिंह यांचे प्रभावक्षेत्र म्हणून हा भाग ओळखला जातो.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2019 रोजी प्रकाशित
लक्षवेधी लढत : मंडी
हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे रामस्वरूप शर्मा यांच्याविरोधात काँग्रेसचे आश्रय शर्मा यांच्यात सामना आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 07-05-2019 at 02:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attractive fight in mandi