अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी आज (बुधवार) सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याबाबत मंगळवारी संकेत दिले. मंगळवारी अयोध्या प्रकरणी सुनावणीचा ३९ वा दिवस होता. तसंच सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद बुधवारी पूर्ण करण्याचे आदेशही काल झालेल्या सुनावणीदरम्यान देण्यात आले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
आज सर्व पक्षकार आपला युक्तीवाद पूर्ण करतील अशी आशा असल्याची माहिती हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी दिली. त्यानंतर मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा करण्यात येईल. तसंच बुधवारीच यावर चर्चा पूर्ण झाल्यास निकाल सुरक्षित ठेवला जाईल. परंतु या सर्व बाबी न्यायालयावर अवलंबून असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पक्षकारांना साडेतीन तासांची वेळ
दरम्यान, दोन्ही पक्षकारांना आज साडेतीन तासांची वेळ देण्यात येईल. तसंच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानतर सुनावणी पूर्ण होईल. दोन्ही पक्षकारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी प्रत्येकी एक एक तास देण्यात येणार असून युक्तीवादासाठी दोन्ही पक्षांना प्रत्येकी ४५ मिनिटे देण्यात येणार आहेत.
कलम १४४ लागू
राम मंदिर प्रकरण संवेदनशील असल्यामुळे अयोध्येमध्ये १० डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. तर तब्बल २०० शाळा २ महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे राम मंदिर आणि बाबरीचा वाद?
अयोध्येतील वादग्रस्त जागेवरच प्रभू रामचंद्रांचा जन्म झाल्याची धारणा आहे
१५ व्या शतकात प्रभू रामचंद्रांचं मंदिर पाडलं गेलं असाही आरोप आहे
१५ व्या शतकात मंदिर पाडून त्याजागी बाबरी मशीद उभारली गेली असाही आरोप आहे
१८५३ मध्ये हिंदू संघटनांनी हा आरोप केला की राम मंदिर पाडून या ठिकाणी मशीद उभारली आहे. या आरोपावरुन पहिल्यांदा देशात हिंदू मुस्लीम दंगलही झाली
१८५९ मध्ये ब्रिटिशांनी वादग्रस्त जागेवर तारांचे कुंपण घालून, या कुंपणाबाहेर आणि आतमध्ये हिंदू आणि मुस्लीम बांधवांना वेगवेळी प्रार्थना करण्याची मुभा दिली
१८८५ मध्ये पहिल्यांदा हे सगळं प्रकरण न्यायालयाच्या दारात पोहचलं. महंत रघुबरदास यांनी फैजाबाद येथील न्यायालयात राम मंदिराच्या निर्मितीसाठी अपिल केलं
२३ डिसेंबर १९४९ : जवळपास ५० हिंदूनी मशिदीच्या केंद्रस्थानी प्रभू रामचंद्रांची मूर्ती ठेवली, ज्यानंतर हिंदू बांधव पूजा करु लागले मात्र मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करणं बंद केलं
१६ जानेवारी १९५० : गोपाल सिंह विशारद यांनी फैजाबाद न्यायालयात अपील करुन रामलल्लाच्या पूजेसाठी विशेष परवानगी मागितली
५ डिसेंबर १९५० : महंत रामचंद्र दास यांनी हिंदूंनी प्रार्थना सुरु ठेवावी यासाठी आणि मशिदीत रामाची मूर्ती ठेवण्यासाठी तक्रार दाखल केली, यावेळी मशिदीला पहिल्यांदाच ‘ढाँचा’ असा शब्द वापरण्यात आला
१७ डिसेंबर १९५९ : निर्मोही आखाड्याने वादग्रस्त जागा मिळावी म्हणून कोर्टात धाव घेतली
१८ डिसेंबर १९५९ : उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाने मशिदीचा मालकी हक्क मिळावा म्हणून कोर्टात धाव घेतली
१९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने बाबरी मशिदीचं कुलुप उघडण्यासंदर्भात आणि रामजन्मभूमीची जागा स्वतंत्र करण्यासाठी एक मोहीम सुरु केली. या जागेवर एक भव्य मंदिर उभारले जाईल ही घोषणा तेव्हाच देण्यात आली
१९८६ मध्ये फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी वादग्रस्त जागेवर हिंदू बांधवांना पूजेची संमती दिली, कुलुपं उघडण्यात आली मात्र मुस्लीम बांधवांनी बाबरी मशीद अॅक्शन कमिटीची स्थापना केली
१९८९ मध्ये भारतीय जनता पार्टीने म्हणजेच भाजपाने विहिंपच्या भूमिकेला औपचारिकरित्या पाठिंबा दिला, ज्यामुळे मंदिराचे थंडावलेले आंदोलन जोषात सुरु झाले
जुलै १९८९ मध्ये या प्रकरणातला पाचवा खटला दाखल करण्यात आला
१९९० मध्ये भाजपाचे अध्यक्ष असलेल्या लालकृष्ण आडवाणी यांनी गुजरातच्या सोमनाथपासून उत्तरप्रदेशातल्या अयोध्येपर्यंत एक रथयात्रा काढली, ज्यानंतर दंगली उसळल्या
१९९० मध्ये आडवाणींना समस्तीपूरमधून अटक करण्यात आली, ज्यानंतर भाजपाने व्ही पी सिंग सरकारचा पाठिंबा काढला
ऑक्टोबर १९९१ मध्ये उत्तर प्रदेशातील कल्याण सिंह सरकारने बाबरी मशिदीच्या शेजारी असलेल्या २.७७ एकर जमिनीचा ताबा घेतला
६ डिसेंबर १९९२ हजारो कारसेवकांनी अयोध्येत पोहचत बाबरी मशिद पाडली, ज्यानंतर जातीय दंगली उसळल्या, घाईने तात्पुरत्या स्वरुपाचे एक मंदिर तयार करण्यात आले
१९९२ पासून हे प्रकरण प्रलंबितच आहे. आता नियमित सुनावणी होणार असल्याने हा वाद लवकरात लवकर मिटेल अशी अपेक्षा आहे.