बलुचिस्तानमधील जनतेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु असतानाच बलुचिस्तानमधील विधानसभेत मोदींचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग – नवाझ या पक्षाचे आमदार मोहम्मद खान लेहरी यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील मुद्दा उपस्थित केला होता. बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळावे यासाठी स्थानिक जनता आणि नेते लढा देत आहेत. मोदींनी हा मुद्दा मांडताच बलुचिस्तानमध्ये पहिल्यांदाच मोदींचा फोटो आणि तिरंगा फडकवत भारताचे आभार मानण्यात आले होते. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणा-या नेत्यांनीही मोदींचे कौतुक केले होते. मोदींच्या या खेळीने पाकिस्तानची कोंडी झाली होती. बलुचिस्तानमधील विधानसभेत मात्र मोदींच्या निषेधाचा प्रस्ताव मांडण्यात आला. सर्वपक्षीय प्रतिनिधींनी हा प्रस्ताव एकमताने मंजुर केले होते. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री नवाज झेहरी यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.
मोदींच्या विधानावरुन हे स्पष्ट होते की बलुचिस्तानमधील दहशतवादी कारवायांना भारताचे पाठबळ आहे असे या प्रस्तावात म्हटले आहे. मोदींनी पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचा आणि संयुक्त राष्ट्राच्या निर्देशांचे भंग केले असा आरोपही या प्रस्तावात करण्यात आला. काश्मीर प्रश्नाला बगल देण्यासाठीच मोदींनी बलुचिस्तानचा मुद्दा मांडला असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षाचे नेते सरदार अस्लम बिझेन्जो यांनी प्रस्तावादरम्यानच्या चर्चेत सर्वपक्षीय नेत्यांनी प्रस्तावाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आम्ही अखंड पाकिस्तानच्या बाजूने आहोत असेही प्रस्ताव मांडणा-या आमदारांनी सांगितले. एकीकडे बलुचिस्तानमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी जर्मनीतील बलुचिस्तान समर्थकांनी तिरंगा फडकवत मोदींच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balochistan assembly resolution condemns modi
First published on: 28-08-2016 at 14:45 IST