एक्स्प्रेस वृत्त
अन्न व्यवसाय संचालकांनी (एफबीओ) त्यांच्या खाद्य उत्पादनांमधून ‘ओरल रिहायड्रेशन सोल्युशन’ अर्थात ‘ओआरएस’ हे नाव यापुढे वापरू देऊ नये, असे निर्देश बुधवारी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अन्न सुरक्षा आयुक्त आणि सर्व केंद्रीय परवाना प्राधिकरणांना जारी केले आहेत. हैदराबाद येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवरंजनी संतोष यांनी यासाठी गेली अनेक वर्षे लढा देत तेलंगण उच्च न्यायालयात धाव घेण्याबरोबरच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिली होती.
चेन्नईतील एका मधुमेहग्रस्त मुलाला निर्जलीकरणामुळे (डिहायड्रेशन) अतिदक्षता (आयसीयू) विभागात दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी त्याला उलट्यांचा त्रास झाल्याने ‘टेट्रा पॅक’मधून ‘ओआरएस’ देण्यात आले होते. परंतु रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची प्रकृती अधिकच गंभीर झाली. अन्य एका घटनेत जळलेल्या जखमांवर उपचार घेणाऱ्या तरुणीची प्रकृती निर्जलीकरणामुळे गंभीर बनते. तिला ‘ओआरएस’ देण्यात आलेले असते. या दोन्ही घटनांमध्ये सीलबंद, विविध चवींचा ‘ओआरएस’ हा समान धागा होता.
गेल्या अनेक वर्षांपासून चिंताग्रस्त नातेवाईक, पालक आदींकडून समाजमाध्यमात येणाऱ्या या घटनांचा बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवरंजिनी संतोष अभ्यास करीत होत्या. डॉ. दिलीप महालानबीस यांनी शोध लावलेल्या खऱ्या ‘ओआरएस’ऐवजी चवदार, गोड पेय अतिसारेची लागण झालेल्या मुलांना सेवन करावे लागू नये, हे डॉ. शिवरंजिनी यांचे उद्दिष्ट होते. बुधवारी अन्न नियामकांनी सर्व पेय उत्पादकांना त्यांच्या व्यापार चिन्हावर ‘ओआरएस’ हा शब्द वापरण्यास बंदी घालणारा आदेश जारी केल्यानंतर डॉ. शिवरंजिनी यांच्या या लढ्याला यश आले.
समाजमाध्यमातून आठ वर्षांपूर्वीपासून नागरिकांना शिक्षित करण्यासापासून डॉ. शिवरंजिनी यांचा प्रवास सुरू झाला. यामध्ये त्यांनी दवाखान्यात येणाऱ्या मुलांचे निरीक्षण केले. त्यात पालकांनी ‘ओआरएस’ समजून पाल्याला विविध चवींचे पेय दिल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनल्याचे लक्षात आले. गेल्या काही दशकांत ‘ओआरएस’ असल्याचा दावा करणारी अनेक उत्पादने बाजारात आली. परंतु त्यात एखाद्या व्यक्तीच्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या साखर आणि मिठाच्या गुणोत्तराचे योग्य प्रमाण राखले गेले नसल्याचेे डॉ. शिवरंजिनी संतोष यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
‘वेळेत उपचार न घेतल्यास मृत्यूचा धोका’
– ‘ओआरएस’ हे एक वैद्यकीय उत्पादन आहे, ज्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचले आहेत. पाच वर्षांखालील मुलांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे १३ टक्के मृत्यू अतिसारामुळे होतात. अशा मृत्यूंना रोखण्यासाठी ‘ओआरएस’ हे एक प्रभावी साधन आहे.
– ‘ओआरएस’मध्ये ग्लुकोज, सोडियम क्लोराईड आणि पोटॅशियम क्लोराईड किती असावे यासाठी एक निश्चित सूत्र आहे. साखर आणि मीठ शरीरात पाणी खेचतात आणि व्यक्तीला पुन्हा निर्जल करतात. अधिक साखर आतड्यात पाणी खेचते आणि त्यामुळे अतिसार वाढते.
– ‘ओआरएस’च्या नावाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेली उत्पादने मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहेत. वेळेत वैद्यकीय उपचार न घेतल्यास मृत्यूदेखील होऊ शकतो, असे डॉ. शिवरंजिनी संतोष यांनी सांगितले.
