Bangladesh security forces target Hindus: बांगलादेशच्या चितगाव येथे ५ नोव्हेंबर रोजी एका वादग्रस्त सोशल मिडिया पोस्टमुळे हिंसाचार उसळला. या पोस्टमुळे सैन्य आणि हिंदू समाज एकमेकांसमोर आले. बांगलादेशमधील इस्लामिक कट्टरपंथी गट जमात-ए-इस्लामी संघटनेचा सदस्य ओस्मान अलीने हिंदी समाज आणि इस्कॉन संस्थेबाबत वादग्रस्त पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर हिंदू समाजाने नाराजी व्यक्त केली. यांतर ओस्मान अलीच्या दुकानाबाहेर जमून हिंदू समाजाने निदर्शने केली. ज्यामुळे दोन गटात तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर सैन्याला पाचारण करण्यात आले.

परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर हिंदूबहुल असलेल्या हजारी गल्ली येथे बांगलादेशचे लष्कर आणि इतर सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले. यावेळी सैन्यातील जवानांनी हिंदूंवर अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे.

बांगलादेशी लेखिका आणि सध्या भारतात आश्रयास असलेल्या तसलीमा नसरीन यांनी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी हजारी गल्लीत झालेल्या हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ त्यांच्या एक्स अकाऊंटवर टाकले होते. या व्हिडीओमध्ये हजारी गल्लीत उसळलेला हिंसाचार दिसून येत आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि सामान्य नागरिक आपापसात भिडल्याचे दिसत आहे. चितगावमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, लोकांना पांगविण्यासाठी सैन्याच्या वतीने इथे गोळीबारही करण्यात आला होता. तर काही अधिकारी सीसीटीव्ही कॅमेरे तोडत असल्याचेही दिसत आहे.

चितगावमधील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक नागरिकांनी सुरक्षा दलाचा जोरदार प्रतिकार केला. काही आंदोलकांनी विटा आणि अॅसिड फेकले. यात नऊ जवान जखमी झाले. एका जवानाला अॅसिडमुळे गंभीर जखम झाली. ढाका ट्रीब्यूनने दिलेल्या बातमीनुसार मंगळवारी, यंत्रणेने ५८२ लोकांवर गुन्हे दाखल केले तर ४९ लोकांना ताब्यात घेतले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हिंदू समाजाच्या नेत्यांनी सुरक्षा दलावर गंभीर आरोप केले. सैन्याने केवळ हिंदूबहुल वस्तीलाच लक्ष्य केले आणि घरात घुसून अत्याचार केला. आंदोलनात दोन्ही समाजाचे लोक सामील असताना केवळ हिंदूंना लक्ष्य केल्याचा गंभीर आरोप समाजाच्या नेत्यांनी केला. चितगावमधील हजारी गल्ली हा भाग पूर्वीपासून हिंदूबहुल म्हणून ओळखला जातो. हिंदू व्यापाऱ्यांची इथे दुकाने आहेत. सध्या येथे तणावाचे वातावरण असल्यामुळे अनेकांना घरातून बाहेर पडता येत नाही. तसेच पोलीस घरा-घरात जाऊन शोधमोहीम राबवत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे.