लंडन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त मालिकेचे शुक्रवारी बीबीसीने समर्थन केले. हा माहितीपट सखोल संशोधनाअंती तयार केला असून त्यात काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित करण्याचा हेतू आहे, असे बीबीसीने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी या माहितपटाचा भारत सरकारने निषेध केला होता. कोणतेही तथ्य नसलेला हा निव्वळ प्रचारपट आहे, असे भारताने म्हटले होते. यानंतर बीबीसीच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च संपादकीय प्रमाणकांनुसार या माहितपटासाठी सखोल संशोधन करण्यात आले आहे.

बीबीसीच्या या माहितीपटात दावा केला आहे की, ब्रिटनच्या परराष्ट्र खात्याच्या काही तत्कालीन राजनैतिक अधिकाऱ्यांना असे वाटत होते की, गुजरातमधील २००२ च्या दंगलींना मोदी हे थेट जबाबदार आहेत.  त्यावर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना वार्ताहरांनी विचारले होते की, बीबीसीच्या या दाव्याशी तुम्ही सहमत आहात काय? सुनक म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी प्रतिमा पाकिस्तानी वंशाचे मजूर पक्षाचे खासदार इम्रान हुसेन यांनी रंगविली आहे, तिच्याशी मी सहमत नाही. ब्रिटिश सरकारची याबाबतची भूमिका आधीपासूनच सुस्पष्ट असून त्यात कोणताही बदल झालेला नाही, असेही सुनक यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. आम्ही कोणत्याही प्रकारच्या वंशविच्छेदाचे समर्थन करीत नाही, पण मोदी यांच्याविषयी जे चित्र उभे करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. 

बीबीसीच्या प्रवक्त्याने दावा केला आहे की, हा माहितीपट तयार करताना वेगवेगळय़ा विचारांचे लोक, साक्षीदार आणि तज्ज्ञांशी आम्ही संपर्क साधला. यात भारतीय जनता पक्षातील लोकांचाही समावेश आहे. या प्रकरणावर आम्ही भारत सरकारलाही म्हणणे मांडण्याची संधी दिली. पण त्यांनी नकार दिला. जगभरातील महत्त्वाचे प्रश्न मांडण्यास बीबीसी कटिबद्ध आहे.

दरम्यान, मोदी यांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याबद्दल ब्रिटनमधील भारतीय समुदायाच्या अनेक सदस्यांनी बीबीसीकडे तक्रार केली आहे. भारतीय वंशाचे लॉर्ड रामी रेंजर यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, बीबीसीने लक्षावधी भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत असून लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान, भारतीय पोलीस आणि भारतीय न्यायसंस्थेचा अवमान केला आहे. आम्ही दंगली- जीवितहानीचा निषेध करतो, त्याचप्रमाणे अशा पूर्वग्रहदूषित वार्ताकनाचाही निषेध करतो.

कुणीही विश्वास ठेवणार नाही अशा मताचा प्रचार करण्यासाठी तयार केलेला हा माहितीपट आहे. यात पूर्वग्रह, तथ्यांचा अभाव आणि वसाहतवादी दृष्टिकोन दिसून येतो. अरिंदम बागची, भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bbc defends documentary on indian pm narendra modi zws
First published on: 21-01-2023 at 06:16 IST