Healthy Breakfast : आपल्यापैकी किती लोक दररोज नाश्ता करतात? काही लोक ‘हो’; तर काही लोक ‘नाही’ म्हणतील. रात्रभर आराम केल्यानंतर सकाळी शरीराच्या चयापचय प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा ठरतो. पण, आपल्यापैकी बरेच लोक दररोजच्या धावपळीत सकाळचा नाश्ता टाळतात किंवा शरीराला आवश्यक असा पौष्टिक नाश्ता करत नाहीत. ‘केलॉग्स इंडिया’ (Kellogg’s India)च्या एका अभ्यासात शहरातील भारतीय लोकांच्या नाश्त्याच्या सवयींविषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यात सकाळच्या नाश्त्याकडे आपण कसे दुर्लक्ष करतो, याविषयी सविस्तर सांगितले आहे.

या अभ्यासात सांगितल्याप्रमाणे, २५ टक्के शहरात राहणारे भारतीय लोक नाश्ता करणे टाळतात आणि जे लोक नाश्ता करतात, त्यापैकी ७२ टक्के लोकांना पोषक घटकांची कमतरता जाणवते. फक्त तीन टक्के लोक पोषक नाश्ता करतात. यावरून तुमच्या लक्षात येईल की, आपल्याला नाश्त्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची किती प्रकर्षाने गरज आहे.

त्याशिवाय या अभ्यासातून असेही समोर आले की, नियमित नाश्ता केल्याने टाईप-२ मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब यांसारख्या आरोग्याच्या समस्या दूर होतात. त्याविषयी द इंडियन एक्स्प्रेसने नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ वर्षा गोरे आणि केल्लानोव्हा इंडिया (केलॉग्स इंडिया)येथील न्युट्रिशन विभागाच्या आहारतज्ज्ञ नादिया मर्चंट यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली आहे.

हेही वाचा : Sugarcane : उन्हाळ्यात उसाचा रस पिताय? जाणून घ्या, उसाचे सेवन करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?

नाश्ता का गरजेचा?

आहारतज्ज्ञ नादिया मर्चंट सांगतात, “सकाळचा नाश्ता टाळल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो.” तेव्हा सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा आहे, जाणून घ्या.

  • ‘केलॉग्स इंडिया’च्या अभ्यासात सांगितल्याप्रमाणे, जी मुले नियमितपणे नाश्ता करतात, त्यांची स्मरणशक्ती चांगली असते आणि ते चांगल्या प्रकारे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतात; ज्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती दिसून येते.
  • जे लोक नियमित नाश्ता करतात, ते निरोगी राहतात आणि त्यांचे वजन संतुलित राहते. पौष्टिक नाश्तामुळे पोट भरल्यासारखे वाटते; ज्यामुळे त्यांना दिवसातून कधीही स्नॅक खायची इच्छा होत नाही.
  • नियमित नाश्ता केल्याने लठ्ठपणा, हृदयाशी संबंधित आजार आणि मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.

हेही वाचा : पाणी किंवा चहात फक्त १५ मिली ‘हे’ द्रव घातल्यास कंबरेचा घेर व वजन होईल कमी; नवीन अभ्यास काय सांगतो?

पौष्टिक नाश्ता कसा निवडावा?

संतुलित आहार निरोगी आरोग्यासाठी चांगला असतो. नाश्त्यामध्ये नेहमी विविध प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश करा. मर्चंट आणि गोरे यांनी पौष्टिक नाश्ता कसा असावा, याविषयी सांगितले आहे.

  • तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्स, नाचणी किंवा गव्हाचा समावेश करू शकता. त्यामध्ये भरपूर फायबर असते; जे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा पुरवतात. फायबरमुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे वारंवार भूक लागत नाही.
  • सकाळच्या नाश्त्यामध्ये स्ट्रॉबेरी, केळी किंवा तुम्हाला आवडेल त्या फळांचा समावेश करा. फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.
  • दही किंवा दुधाचे सेवन केल्याने स्नायू मजबूत होतात. त्यामध्ये फायबर असते; ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्याशिवाय दूध किंवा दह्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजेसुद्धा असतात.
  • जर तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये बदाम, अक्रोड, जवस, काजू खाल्ले, तर तुम्हाला ओमेगा-३ व ओमेगा-६ फॅटी अॅसिड्स, प्रोटीन्स, फायबर व व्हिटॅमिन ईसारखे अनेक आवश्यक पोषक घटक मिळू शकतात. वाळलेल्या मनुका, अॅप्रिकोट्स खाल्यामुळे शरीराला रक्तातून साखरेची कमतरता जाणवत नाही. हा सुका मेवा फायबर, अँटिऑक्सिडंट्स व जीवनसत्त्वे यांचा उत्तम स्रोत आहे.