वृत्तसंस्था, दुबई
आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या रविवारच्या सामन्यात विजयानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता मैदान सोडण्याच्या भारतीय संघाच्या कृतीचे पडसाद सोमवारी उमटले. पहलगाम हल्ल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून याकडे पाहिले जात आहे. मात्र, पाकिस्तानशी सामना खेळण्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांकडून होणारी टीका, समाजमाध्यमांतून व्यक्त झालेला संताप यानंतर बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आशिया चषक स्पर्धेच्या गट सामन्यात पाकिस्तानवर सहज विजय मिळवल्यानंतर मैदानावर असलेले भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे लगेच मैदानाबाहेर परतले. त्यांच्यासह संपूर्ण भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूच नव्हे तर पंच आणि सामनाधिकाऱ्यांशीही हस्तांदोलन करणे टाळले. सामन्याच्या नाणेफेकीनंतरही भारत-पाकिस्तानच्या कर्णधारांनी हस्तांदोलन केले नाही. या सगळ्या प्रकारावरून पाकिस्तानने सोमवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. सामन्यानंतरच्या सोहळ्याला पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा अनुपस्थित राहिला.
भारतीय संघाची कृती ‘खिलाडूवृत्ती’ आणि ‘खेलभावने’ला न शोभणारी होती, असा दावा ‘पीसीबी’ने केला आहे. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मात्र आपल्या खेळाडूंच्या कृतीचे समर्थन करताना ‘काही गोष्टी खिलाडूवृत्तीपेक्षा मोठ्या असतात’ असे म्हटले आहे.
स्पर्धेत भारताचा आणखी दोन वेळा (सुपर फोर आणि उपांत्य/अंतिम सामना) पाकिस्तानशी सामना होऊ शकतो. मात्र, त्यावेळीही भारतीय संघ रविवारसारखीच भूमिका कायम ठेवेल, असे सांगण्यात येते. हा निर्णय उत्स्फूर्त नसल्याचेही बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले. भारताला जेतेपद मिळाले तर चषक स्वीकारण्यासाठी भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यासपीठावर जाणार नाही, असेही समजते.
पाकिस्तानशी सामना खेळत असल्याच्या मुद्द्यावर विरोेधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांसह समाजमाध्यमांवरूनही याबद्दल नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने हा ‘बहिष्कारा’चा निर्णय घेतल्याचे समजते.
भारतीय संघाची कृती खिलाडूवृत्तीला अशोभनीय होती आणि हे अत्यंत निराशाजनक आहे. खेळात राजकारण आणणे हे खेळभावनेच्या विरोधात जाणारे आहे. भविष्यात सर्वच संघ आपला विजय अधिक योग्य पद्धतीने साजरा करतील अशी आशा आहे. – मोहसीन नक्वी, ‘पीसीबी’ आणि ‘एसीसी’चे अध्यक्ष.
‘राजकारणासाठी वापर’
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भारतीय संघाचा हस्तांदोलन न करण्याचा निर्णय ‘पूर्वनियोजित’ असल्याचे सांगत या मुद्द्याचा राजकारणासाठी वापर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. ‘भारत-पाकिस्तान मुद्द्यावर राजकीय पोळी भाजण्याचा भाजपचा डाव आहे. त्यामुळेच खेळाडूंना हस्तांदोलन न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या,’ असे ते म्हणाले.
आम्ही केवळ खेळण्यासाठी मैदानावर आलो होतो. आम्हाला त्यांना प्रत्युत्तर द्यायचे होते. काही गोष्टी खिलाडूवृत्तीपेक्षा मोठ्या असतात. आम्ही हा विजय ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे राबविणाऱ्या सशस्त्र दलांना समर्पित करतो. भारतीय संघ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. – सूर्यकुमार यादव, भारताचा कर्णधार