Bengaluru Crime: देशात दररोज विविध ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. हाणामारी, लैंगिक अत्याचार, हल्ला, चोरी, हिंसा, दरोडा, खून, जाळपोळ अशा प्रकारच्या घटना वेगवेगळ्या शहरात घडल्याच्या अनेक बातम्या देखील समोर येतात. गुन्हेगारीच्या घटना कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असले तरी गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. आता बंगळुरूमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
बंगळुरूमधील एका रस्त्यावर एका व्यक्तीने महिलेचा पाठलाग करत जबरदस्तीने तिचे ओठ चावत तिचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केलं आहे. मात्र, या घटनेनंतर बंगळुरूमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
नेमकं घटना काय घडली?
बंगळुरूमधील गोविंदपुरा भागातील एका रस्त्यावर एका व्यक्तीने रस्त्यावरून जात असलेल्या एका महिलेचा लैंगिक लैंगिक छळ केल्याचा प्रकार घडला आहे. ही महिला रेशन खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती. तेव्हा तिचा एका व्यक्तीनी पाठलाग केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी महिलेचा लैंगिक छळ केला. तिच्या ओठावर चावा घेतल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संबंधित महिला रेशन खरेदी करण्यासाठी जात होती तेव्हा घडली. मोहम्मद मारूफ शरीफ असं या घटनेतील आरोपीचं नाव असून त्याने तिचा पाठलाग करत अश्लील वर्तन केलं. तसेच रस्त्याच्या मधोमध जबरदस्तीने तिचं चुंबन घेतलं. पण तिने प्रतिकार केला असता त्याने तिच्या ओठावर जोराचा चावा घेतला. मात्र, त्यानंतर संबंधित महिलेने या घटनेची तिच्या आईला माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क साधला असता गोविंदपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याआधीही अशा दोन घटना घडल्या
दरम्यान, बंगळुरूमध्ये ६ जून रोजीही कुक टाउनमधील मिल्टन पार्कजवळ संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास सार्वजनिक गैरवर्तनाच्या दोन सलग घटना घडल्या आहेत. एका व्यक्तीने एका महिलेजवळ जाऊन गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर व्यक्ती हा पार्कमध्ये घुसून आणि जबरदस्तीने त्याने एका महिलेला मिठी मारली आणि तिचं चुंबन घेत लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आल्याची एक घटना घडली होती. तसेच दुसरी एक घटना एप्रिलमध्ये घडली होती. बीटीएम लेआउटमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सार्वजनिक लैंगिक छळाची एक घटना कैद झाली होती. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.