Bengalore Land Dispute Reddit Post: सुमारे २० वर्षांपूर्वी झालेल्या एका जमिनीच्या व्यवहारामुळे बंगळुरूमध्ये कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. मूळ विक्रेत्याच्या मुलीने सध्याच्या मालकांना कायदेशीर नोटीस पाठवून आरोप केला आहे की, तिच्या संमतीशिवाय वडिलांनी ही मालमत्ता विकली आहे.
या जमिनीच्या सध्याच्या मालकाच्या वडिलांनी २००६ मध्ये ही जमीन खरेदी केली होता. या मालकाने रेडिटवर या प्रकरणाची पोस्ट शेअर केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. सोशल मीडियावर सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
जमिनीच्या सध्याच्या मालकाच्या पोस्टनुसार, विक्रेत्याने ही जमीन कोणत्याही पॉवर ऑफ अॅटर्नीशिवाय थेट विक्री केली होती. मालकाने म्हटले आहे की, “यात कोणताही पॉवर ऑफ अॅटर्नी नव्हता,” शिवाय “मालमत्ता खरेदी केल्यापासून आम्ही नियमितपणे मालमत्ता कर भरत आहोत.” या जमिनीचे खाते प्रमाणपत्र देखील याबाबत रेडिटवर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या वडिलांच्या नावावर असल्याचे त्याने नमूद केले आहे.
सर्व कायदेशीर कागदपत्रे व्यवस्थित असूनही, विक्रेत्याची मुलगी आता भरपाईची मागणी करत आहे. तिचा दावा आहे की, विक्रीदरम्यान या व्यवहारासाठी तिची संमती घेण्यात आली नव्हती.
रेडिटवर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने निदर्शनास आणून दिले आहे की, “विक्रीच्या वेळी जमीन विक्रेत्याची मुलगी अल्पवयीन नव्हती. खरं तर, तिच्या लग्नासाठी ही मालमत्ता विकण्यात आली होती.”
याशियाव विक्रेत्याच्या मुलाला आणि खरेदीदाराला नोटीस बजावणाऱ्या महिलेच्या भावाच्या बदलत्या भूमिकेमुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
सुरुवातीला, विक्रेत्याच्या मुलाने हे प्रकरण कौटुंबिक समस्या असल्याचे सांगत खरेदीदाराला आश्वासन दिले होते आणि “ते हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे म्हटले होते. पण काही महिन्यांनंतर त्याने खरेदीदारांना कळवले की त्याचे कुटुंब “या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार आहे.”
जमिनीच्या मालकाने रेडिट पोस्टमध्ये उघड केले की, गेल्या काही दिवसांत विक्रेत्याच्या मुलाचा सूर पुन्हा बदलला आहे आणि तो आता न्यायालयाबाहेर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.
याचबरोबर, विक्रेत्याचा मुलगा खरेदीदाराला सांगत आहे की, जर त्याने त्याच्या बहिणीला काही पैसे दिले, तर तो तिची सही मिळवून देऊ शकतो. त्याचा असाही दावा आहे की, इतर दोन-तीन खरेदीदारांनी आधीच त्याच्या बहिणीला काही रक्कम देऊन अशी प्रकरणे न्यायालयाबाहेर मिटवली आहेत.