UNESCO Memory of World Register: भारतासह जगभरात वास्तव्य करणाऱ्या तमाम भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरावी अशी बातमी समोर आली आहे. UNESCO अर्थात जगभरातल्या हेरिटेज साईट्सचं जतन व संवर्धन करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जागतिक संस्थेनं भगवदगीता व नाट्यशास्त्र या दोन भारतीय ग्रंथांचा आपल्या ‘मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समावेश केला आहे. या समावेशानंतर या रजिस्टरमधील समाविष्ट भारतीय लिखितांची एकूण संख्या १४वर पोहोचली आहे. या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे!

मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टरमध्ये एकूण ५७० लिखितांचा समावेश!

१७ एप्रिल रोजी युनेस्कोनं जगभरातल्या एकूण ७४ लिखितांचा समावेश या यादीमध्ये केला. त्यात भगवदगीता व नाट्यशास्त्राचा समावेश आहे. आता वर्ल्ड रजिस्टरमधील लिखितांची एकूण संख्या तब्बल ५७० पर्यंत पोहोचली असून त्यात १४ भारतीय लिखितांचा समावेश आहे.

केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी शुक्रवारी सकाळी यासंदर्भातली माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली. “श्रीमदभगवदगीता व भारत मुनी यांनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताचं शाश्वत ज्ञान आणि कलात्मक नैपुण्य यांचा हा सन्मान आहे”, असं शेखावत यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आनंद!

दरम्यान, शेखावत यांनी केलेली पोस्ट पुन्हा शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सन्मानावर आनंद व्यक्त केला आहे. “जगभरात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. गीता आणि नाट्यशास्त्राचा युनेस्कोच्या मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश होणं हा आपल्या शाश्वत ज्ञान आणि समृद्ध संस्कृतीचा सन्मान आहे. भगवदगीता आणि नाट्यशास्त्रानं अनेक पिढ्यांवर संस्कार केले आहेत आणि अनेक शतकांपासून आपली सदसदविवेकबुद्धी जागृत ठेवली आहे. या ग्रंथांमधील ज्ञान हे अवघ्या जगाला कायम प्रेरणा देत राहील”, असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर?

UNESCO या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून जगभरातल्या हेरिटेज वास्तू आणि गोष्टींचं जतन केलं जातं. अशा वास्तूंवर ‘जागतिक वारसा स्थळ’ असं नमूदही केलेलं असतं. भारतासह जगभरात अशी शेकडो ठिकाणं आहेत. युनेस्कोच्या माध्यमातून अशाच प्रकारे जगभरातल्या संपन्न संस्कृती व त्यांचा इतिहास मांडणाऱ्या लिखितांचंही जतन ‘मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर’च्या माध्यमातून केलं जातं. याच यादीत आता भगवदगीता व नाट्यशास्त्र यांचा समावेश करण्यात आला आहे.