बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वत:हून दखल घेतली आहे. पुणे पोलिसांनी अटक करताना नियमावलीचे पालन केले नाही असे प्रथमदर्शनी दिसते. मानवी हक्कांचे हे उल्लंघन आहे, असे मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सुधीर ढवळे, प्रा. शोमा सेन, रोना विल्सन, अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. या सर्वांचा नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी मंगळवारी देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले. पुणे पोलिसांनी वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, वरवरा राव, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांना अटक केली. या सर्वांचा नक्षली संघटनांशी संबंध असल्याचा आरोप आहे.

पुणे पोलिसांच्या या कारवाईचा देशभरातून निषेध होत आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही बुधवारी या प्रकरणाची दखल घेतली. पुणे पोलिसांनी अटक करताना नियमावलीचे पालन केले नाही असे प्रथमदर्शनी दिसते. मानवी हक्कांचे हे उल्लंघन आहे, असे मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे.