पीटीआय, अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री व भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा झाला. पटेल सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्यासह अन्य १६ मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यापैकी आठ कॅबिनेट दर्जाचे आहेत. यात ११ माजी मंत्री नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत.

नवीन सचिवालयाजवळील हेलिपॅड मैदानावर आयोजित समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्याचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून पटेल यांना शपथ दिली. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये कनू देसाई, हृषीकेश पटेल, राघवजी पटेल, बलवंतसिंग राजपूत, कुंवरजी बावलिया, मुलुभाई बेरा, कुबेर डिंडोर आणि भानुबेन बावरिया यांचा समावेश आहे. हर्ष संघवी आणि जगदीश विश्वकर्मा यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून शपथ घेतली. इतर सहा राज्य मंत्र्यांमध्ये पुरुषोत्तम सोलंकी, बच्चूभाई खाबड, मुकेश पटेल, प्रफुल्ल पानशेरिया, भिखुसिंह परमार आणि कुवरजी हलपती यांचा समावेश आहे. या १६ मंत्र्यांपैकी चार (बावलिया, खाबड, सोलंकी आणि मुकेश पटेल) कोळी समाजातील, तीन (राघवजी, हृषीकेश आणि प्रफुल्ल) पाटीदार, तीन (विश्वकर्मा, परमार आणि बेरा) इतर मागासवर्गीय (ओबीसी) व दोन (हलपती व डिंडोर) आदिवासी समाजातील आहेत. बावरिया हे अनुसूचित जाती समाजातील, संघवी जैन, देसाई ब्राह्मण आणि राजपूत क्षत्रिय आहेत.

भूपेंद्र पटेल यांच्या या नव्या मंत्रिमंडळातील ११ माजी मंत्र्यांपैकी सात जण सप्टेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ या काळात त्यांच्या मंत्रिमंडळात होते. यात हर्ष संघवी, जगदीश विश्वकर्मा, कनुभाई देसाई, हृषीकेश पटेल, राघवजी पटेल, कुबेर डिंडोर व मुकेश पटेल यांचा समावेश आहे. यापूर्वी भाजप सरकारमध्ये मंत्री होते अशा इतर चार मंत्र्यांत सोलंकी, बेरा, खबाद आणि बवालिया यांचा समावेश आहे. शपथविधी सोहळय़ाला पंतप्रधान मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

गुजरात प्रगतीची नवी उंची गाठेल : मोदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान मोदींनी ‘ट्वीट’ संदेशाद्वारे मुख्यमंत्री पटेल व त्यांच्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. शपथविधी सोहळय़ानंतर ‘ट्वीट’संदेशात त्यांनी नमूद केले, की भूपेंद्रभाई पटेल यांचे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्या सर्वाचेही मी अभिनंदन करतो. हा एक ऊर्जावान-उत्साही संघ असून, तो गुजरातला प्रगतीच्या आणि विकासाच्या नव्या उंचीवर नेईल.