पीटीआय, भावनगर : गुजरातमधील भाजप सरकारने प्रसिद्धीवर पैसे वाया न घालवता राज्यात अनेक मोठमोठे प्रकल्प आणले आहेत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. गुजरातमध्ये ६,००० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. त्यानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते.

हेही वाचा >>> गर्भपात हा महिलेचा अधिकारच; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; विवाहित-अविवाहित भेद घटनाबाह्य़

हेही वाचा >>> रशिया आज युक्रेनचा लचका तोडणार!; सार्वमत घेतलेल्या चार प्रदेशांच्या विलीनीकरणाची घोषणा

‘‘गुजरातला देशातील सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे. असे असताना स्वातंत्र्यानंतर अनेक दशके याच्या विकासाकडे लक्ष दिले गेले नाही. मात्र गेल्या २० वर्षांत, भाजप सरकारच्या काळात गुजरातला संपन्नतेचे प्रवेशद्वार बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला,’’ असे पंतप्रधान म्हणाले. लोकांची सेवा करणे हीच सत्ता मानल्यामुळे भाजपने कायमच वचनांची पूर्तता केली आहे, असेही त्यांनी सांगितले. भावनगर, बोताड आणि अमरेली जिल्ह्यांमध्ये जगातील पहिले सीएनजी टर्मिनल, एका बंदराचा विकास, कार्गो कंटेनर निर्मिती कारखाना यासह अन्य ६,००० कोटींचे प्रकल्प सुरू करण्यात आले. पंतप्रधान गुरूवारपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते तब्बल २९,००० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी किंवा उद्घाटन करणार आहेत.

हेही वाचा >>> अशोक गेहलोत रिंगणाबाहेर!; काँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, दिग्विजय सिंह यांचे आज अर्ज

विकासाकडे लक्ष न दिल्यामुळे किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या वाढल्या. त्यामुळे लोकांनी स्थलांतर केले आणि गावेच्या गावे ओस पडली. येथील तरूणांना सूरतसारख्या शहरांत जाऊन हालाखीत दिवस काढावे लागत आहेत. आम्ही अनेक बंदरांचा विकास केला. त्यामुळे आयात-निर्यातीला चालना देण्याबरोबरच गुजरातची किनारपट्टी आता लाखोंना रोजगारही देत आहे.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान